सौजन्य फोटो - सोशल मिडीया
अमरावती : प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याच्या रागातून १९ वर्षीय वर्गमैत्रिणीच्या गळ्यावर चाकूने दोन वार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बडनेरा येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्चमध्ये घडली. मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास महाविद्यालयाच्या पायऱ्यांवरच हा प्रकार घडला. या हल्ल्यात प्राप्ती नावाची तरुणी गंभीर जखमी झाली असून, सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी नवीन मेघराज वानवाणी (१९, रा. सिंधी कॅम्प, बडनेरा) याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. प्राप्तीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली.
प्रॅक्टिकल लिहून मागितले, नकार मिळताच हल्ला
प्राप्ती आणि नवीन हे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतात. मंगळवारी दुपारी सुमारे १२ वाजता प्रॅक्टिकल संपल्यानंतर प्राप्ती वर्गाबाहेर आली. त्यावेळी नवीनने तिचा पाठलाग करत महाविद्यालयाच्या पायऱ्यांवर तिला गाठले. त्याने प्राप्तीकडे प्रॅक्टिकल लिहून देण्याची मागणी केली. मात्र, तिने नकार दिल्याने नवीन संतापला आणि त्याने बॅगमध्ये आणलेल्या चाकूने तिच्या मानेवर दोन वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आरडाओरड ऐकून चौकीदार, विद्यार्थ्यांनी पकडले
चाकूने हल्ला झाल्यानंतर प्राप्तीने जीवाच्या आकांताने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून महाविद्यालयातील चौकीदार आणि विद्यार्थ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यानंतर पसार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवीनला त्यांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
रुग्णालयात उपचार; प्रकृती धोक्याबाहेर
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्राप्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असून, सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात काही काळ खळबळ उडाली. बडनेरा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.






