
gold
मिळालेल्या माहितीनुसार, बँकेत एकूण १०१ ग्राहकांनी सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते. अंतर्गत पडताळणीत २९ नोव्हेंबर २०२५ ते ११ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तिजोरीत सुरक्षित ठेवलेली ८ पाकिटे बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाले. प्रकार उघड होताच बँक व्यवस्थापनात खळबळ उडाली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन नागपूर मुख्यालयातून प्रादेशिक व्यवस्थापक भावना जोशी यांनी शाखेत धाव घेत सीसीटीव्ही फुटेज, संबंधित कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली.
तपासादरम्यान संबंधित सोन्याची पाकिटे तिजोरीत आढळून न आल्याने कर्मचाऱ्यांच्या सहभागाचा संशय व्यक्त केला जात आहे. याआधारे शाखा व्यवस्थापक योगेश बबनराव वानखेडे, कॅशियर हरीश वसंत देवगडे आणि लिपिक निखिल क्षीरसागर यांच्याविरुद्ध दत्तापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली २१ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास ठाणेदार गिरीश ताथोड व त्यांच्या पथकाकडून सुरू आहे.
बँकिंग व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह सूत्रांच्या माहितीनुसार १७फेब्रुवारीलाच प्राथमिक तक्रार पोलिसांकडे देण्यात आली होती. दरम्यान, चोरीस गेलेल्या सोन्याबाबत ठोस काही हाती लागले नाही. घटनेनंतर ग्राहकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, इतर ठेव रकमेची सुरक्षितताही धोक्यात तर नाही ना, अशी चर्चा शहरात रंगली आहे. या प्रकारामुळे स्थानिक बँकिंग व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. पोलीस तपास सुरू असून लवकरच सत्य बाहेर येईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
अमरावतीत ५९ ग्राहकांनी बँकेत तारण म्हणून सोने ठेवले होते. मात्र अंतर्गत चौकशीत त्यापैकी काही दागिने बनावट असल्याचे उघड झाले. नामांकित एका बँकेच्या राजापेठ शाखेत हा धक्कादायक प्रकार समोर आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली असून, प्रकरणामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.