मुलांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन सुपरहिरो, अॅनिमेशन पात्रे आणि प्राण्यांच्या आकारातील पिचकाऱ्या उपलब्ध आहेत. रंगीत आणि आकर्षक डिझाइनमुळे मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांच्या मते, यंदा हलक्या व मजबूत प्लास्टिकपासून बनवलेल्या पिचकाऱ्यांना अधिक पसंती मिळत आहे. पालकांकडून सुरक्षिततेवर भर दिला जात असल्याने टोकदार कडा असलेल्या पिचकाऱ्यांना टाळण्यात येत आहे.
मोचीगल्लीतील एका विक्रेत्याने सांगितले की, बाळांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत डिझाइनमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच हर्बल व त्वचेस अनुकूल रंगांचे पॅकेट्स आकर्षक सवलतीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सध्या शाळांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे ग्राहकसंख्या तुलनेने कमी असली तरी परीक्षा संपताच बाजारात मोठी गर्दी होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तरीही सायंकाळच्या वेळी बाजारात पालकांसोबत पिचकारी खरेदीसाठी आलेल्या मुलांची चांगलीच वर्दळ दिसत आहे.
बाजारात ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत विविध किमतींच्या पिचकाऱ्या उपलब्ध असल्याने सर्व स्तरातील नागरिक आपल्या मुलांसाठी खरेदी करत आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण असून, रंगांच्या या सणाने लहानग्यांच्या चेहऱ्यावर आधीच आनंदाची उधळण केली आहे. यंदाची होळी अधिक सुरक्षित आणि आनंददायी व्हावी, यासाठी पालकांनी मुलांना नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहनही केले आहे. रंगपंचमीचा जल्लोष रंगीबेरंगी पिचकाऱ्यांसह साजरा करण्यासाठी अमरावतीकर सज्ज झाले आहेत.






