
गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, घुमावल येथील एका कुटुंबातील १२ वर्षीय मुलाला गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी व्हायचे होते. मात्र, आई-वडिलांनी त्याला मिरवणुकीत जाण्यास परवानगी दिली नाही. याचा त्याला राग आला होता. त्यानंतर त्याने घरातील वरच्या मजल्यावर जाऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, संबंधित मुलगा मोबाईलवर सतत रिल्स पाहत असे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण काय होते, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद क्रमांक ४८/२०२६ करण्यात आली आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. अवघ्या १२ वर्षांच्या मुलाने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पालकांनी मुलांच्या भावनिक स्थितीकडे, त्यांच्या मोबाईल वापराकडे आणि त्यांच्या मनातील घडामोडींकडे संवेदनशीलतेने लक्ष देण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित झाली आहे.
हे सुद्धा वाचा : बहिणीची छेड काढल्याचा राग, बेदम मारहाण करुन तरुणाचा खून; वाकडमधील घटनेनं खळबळ
कोथरुडमध्ये महिलेची गळफास घेउन आत्महत्या
गेल्या काही दिवसाखाली पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली आहे. ही घटना २२ ऑगस्टला सकाळी साडेदहाच्या सुमारास कोथरुडमधील सुतारदरा लेनक्रमांक २९ मध्ये घडली आहे. मोनाली गोविंद पवार (वय २५ रा. सुतारदरा, कोथरुड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती गोविंद पवार याच्याविरूद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मोनाली व गोंविद यांचे काही महिन्यांपुर्वी लग्न झाले होते. मात्र, गोविंदचे एका दुसऱ्या महिलेसोबत संबंध होते. त्यामुळे पवार दाम्पत्य यामध्ये सातत्याने वाद होत होते. वादातून गोविंद मोनालीला शिवीगाळ करणे, मारहाण करीत जाच करीत होता. मोनालीने २२ ऑगस्टला राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेउन आत्महत्या केली. आत्महत्येला जबाबदार असल्याप्रकरणी तिच्या नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे तपास करीत आहेत.