
आधी काळेवाडीत कोयत्याचा थरार, नंतर पिंपरीत व्यापाऱ्याला लुटले; एकाच रात्री दोन गंभीर घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२९ ऑक्टोबर) रात्री सुमारे १० वाजता काळेवाडीतील इंडियन कॉलनी येथे हा हल्ला झाला आहे. फिर्यादी आकाश दत्ता पवार (वय २३) हा पायी जात असताना अक्षय ऊर्फ गोट्या छत्री (रा. भीमनगर, पिंपरी), कृष्णा सोनवणे (रा. रहाटणी) आणि शकलीन शेख (रा. काळेवाडी) यांनी त्याला रस्त्यात अडवले. फोनवरून झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून तिघांनी त्याच्याशी शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी कृष्णा सोनवणे याने आकाशच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत पसरवली.
हल्ल्यानंतर अवघ्या काही वेळात व्यापाऱ्याला लुटले
काळेवाडीतील हल्ल्यानंतर अवघ्या काही वेळातच टोळीने पिंपरीतील ड्रायफ्रूट व्यापारी क्रिशन नारायणदास धामेजा (वय ४३) यांना लक्ष्य केले. रात्री सुमारे १०.४५ वाजता अशोक थिएटरजवळील पीडब्ल्यूडी कॉलनीसमोर दोन विनानंबरच्या स्कूटींवरून आलेल्या तोंडाला मास्क लावलेल्या आरोपींनी त्यांचा रस्ता अडवला. धारदार शस्त्रांचा धाक दाखवून त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या लाल रंगाच्या डिओ स्कूटीच्या डिक्कीत ठेवलेले चार लाख रुपये रोख आणि सुमारे २० हजार रुपये किमतीची स्कूटी घेऊन आरोपी पसार झाले.
दोघे पोलिसांच्या ताब्यात; साथीदारांचा शोध सुरू
या लुटीप्रकरणी पिंपरी पोलिसांनी अक्षय छत्री आणि शकलीन शेख या दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी व्यापाऱ्याची लुटलेली स्कूटी तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन दुचाकी वाहनेही जप्त केली आहेत. या प्रकरणात पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, काळेवाडीतील तरुणावरील हल्ल्याप्रकरणीही अक्षय, कृष्णा आणि शकलीन या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: आरोपींनी ड्रायफ्रूट व्यापारी क्रिशन धामेजा यांना शस्त्रांचा धाक दाखवून ४ लाख रुपये रोख आणि सुमारे २० हजार रुपये किमतीची स्कूटी लुटली.
Ans: आकाश पवार या २३ वर्षीय तरुणावर अक्षय ऊर्फ गोट्या छत्री, कृष्णा सोनवणे आणि शकलीन शेख यांनी जुन्या वादातून हल्ला केला. यावेळी कृष्णा सोनवणे याने कोयत्याने त्याच्या डोक्यावर वार केला.
Ans: पिंपरी पोलिसांनी अक्षय छत्री आणि शकलीन शेख या दोघांना ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.