संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे नागरिकांच्या लाखोे रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. पुण्यातील वानवडी परिसरात चोरट्यांनी रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठाला लुटल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून या तिघांनी रिक्षाचा पाठलाग करून तो रिक्षा अडविला आणि त्यानंतर धक्काबुक्की करून ६० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.
याप्रकरणी ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अनोळखी तिघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार दोन दिवसांपुर्वी रात्री साडे दहाच्या सुमारास घडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे वानवडीत राहण्यास आहेत. ते बाहेर गेले होते. तेथून ते घरी परतत होते. त्यांनी प्रवासी रिक्षा घेतली. रिक्षाने ते परत येत असताना राईट फ्लॉक रोडवरील मधूरावाला ग्राऊंड येथे आले असता दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या चोरट्यांनी त्यांची रिक्षा अडवली. तसेच, त्यांना धक्काबुक्की करत धमकावून त्यांच्याकडील ६० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेली. तक्रारदारांनी आरडाओरडा केला, पण चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे हे करत आहेत.
पार्क केलेल्या कारच्या डिक्कीतून रोकड चोरली
कल्याणीनगर परिसरात पार्क केलेल्या कारच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी ३० हजारांची रोकड तसेच कागदपत्रे चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ५५ वर्षीय व्यक्तीने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोद केला आहे. हा प्रकार दोन दिवसांपुर्वी भरदुपारी अडीचच्या सुमारास घडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे कल्याणीनगर भागात राहण्यास आहेत. त्यांनी त्यांची कार लेन नंबर ६ मध्ये पार्क केलेली होती. कारच्या डिक्कीत दोन लेदरच्या बॅग व त्यात ३० हजारांची रोकड होती. तर काही कागदपत्रेही होती. अज्ञात चोरट्यांनी डिक्की कशाच्या तरी सहाय्याने उघडून त्यातून या वस्तू चोरून नेल्या. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक फंटागरे हे करत आहेत.






