संग्रहित फोटो
शिक्रापूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील दहिवडी येथील मांजरे वस्ती परिसरात घडलेल्या दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, दोन्ही घटनांमागे एकच आरोपी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
२१ जून २०२४ रोजी यश सुरेश गायकवाड (वय १०) याचा शेतात संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी डोक्यावर जखम असल्याने बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र वनविभागाने हा हल्ला नसल्याचे स्पष्ट केले होते. तरीही त्या वेळी प्रकरणाचा ठोस उलगडा झाला नव्हता. दरम्यान, १९ मार्च २०२५ रोजी त्याच परिसरात साईराज गणेश मांजरे या बालकाचा मृतदेहही तत्सम अवस्थेत आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. दोन्ही घटनांचे स्वरूप सारखे असल्याने संशय अधिक बळावला. घटनेनंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
तपासादरम्यान ताब्यात घेतलेल्या संशयित अक्षय दत्तात्रय मांजरे (वय २२, रा. मांजरे वस्ती, दहिवडी) याने साईराज मांजरेचा खून केल्याची कबुली दिली. पुढील चौकशीत त्याने जून २०२४ मध्ये यश गायकवाड याचाही त्याच पद्धतीने डोक्यात दगड मारून खून केल्याचे कबूल केले. यामुळे दोन्ही बालकांच्या हत्या एकाच आरोपीने केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड करीत आहेत.
तपासावर ग्रामस्थांचा संशय
साईराज मांजरे प्रकरणानंतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी त्यांनी यश गायकवाड प्रकरणात तत्कालीन पोलिसांनी योग्य तपास केला नसल्याचा आरोप केला. आपली बाजू ऐकून न घेतल्याची तक्रार ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडली असून पूर्वीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हे सुद्धा वाचा : अंधश्रद्धेचा बाजार तेजीत; खरात प्रकरणानंतर भोंदू बाबांवर कारवाईची मागणी तीव्र
आरोपी दीर्घकाळ मोकाट राहिल्याचा आरोप
यश गायकवाड प्रकरणात सुरुवातीला योग्य तपास झाला नसल्याने आरोपी दीर्घकाळ मोकाट राहिल्याचा आरोप होत आहे. या कालावधीत तो परिसरात वावरत राहिल्याने त्याचे धैर्य वाढले आणि त्यातूनच दुसऱ्या बालकाचा बळी गेल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.






