संग्रहित फोटो
वसई : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, सतत घडणाऱ्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता विवाहविषयक वेबसाईटवर (मॅट्रिमोनी) स्वतःची ओळख इंजिनिअर म्हणून सांगून एका ३० वर्षीय महिला डॉक्टरची फसवणूक करत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वालीव पोलिसांनी नालासोपारा येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका ३४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
सुभाष सातपुते असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी सुभाष सातपुते याने जून महिन्यात एका मॅट्रिमोनी साईटवर कुमार जाधव या नावाने बनावट प्रोफाइल तयार केले होते. यात त्याने स्वतःला इंजिनिअर असल्याचे भासवत आपले वार्षिक उत्पन्न ३७ लाख रुपये असल्याचे नमूद केले होते. वसईत राहणाऱ्या एका ३० वर्षीय डॉक्टर तरुणीने हे प्रोफाईल पाहून लग्नासाठी होकार दिला. मात्र, आरोपीने लग्नाआधी शारीरिक सुसंगतता तपासण्याची अट घालत तिला एका ‘प्लेबॉय’ सोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले.
शारीरिक संबंधांचा व्हिडिओ रेकॉर्ड
इंजिनिअरच्या सांगण्यावरून तिने या शारीरिक संबंधांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याला पाठवला. यानंतर मात्र, तुझ्याशी लग्न केल्यास तीन महिन्यांत माझा मृत्यू होईल, अशी अंधश्रद्धेची बतावणी करत त्याने लग्नास नकार दिला. त्यानंतर काही काळाने, आपल्याला भेटलेला तो ‘प्लेबॉय’ आणि इंजिनिअर ‘कुमार जाधव’ ही एकच व्यक्ती (सुभाष सातपुते) असल्याचे तरुणीच्या लक्षात आले.
लग्नाचे आश्वासन देत तरुणीवर अडीच वर्षे अत्याचार
पत्नीला घटस्फोट देऊन आपल्याशी लग्न करणार असल्याचे आश्वासन देत एका २५ वर्षीय तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप समोर आला आहे. लग्नासाठी तगादा लावल्यानंतर आरोपीने तरुणीला मारहाण करून लग्न करण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सलून व्यावसायिक वनेश्वर फकीरराव पंडित (रा. पिसादेवी) याच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






