संग्रहित फोटो
पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण यासारख्या घटना घडत आहेत. अशातच आता जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला उशीर होत असल्याच्या कारणावरून एका आर्किटेक्टचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याकडून कोऱ्या चेकवर सह्या करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मंगळवारी (२९ सप्टेंबर) दुपारी १२:३० ते ३:३० वाजेच्या सुमारास रावेत येथील कन्नू की चाय रेस्टॉरंटजवळ ते विश्रांतवाडी दरम्यान घडली आहे.
या प्रकरणात सूरज नाथाजी पाटील (वय ३१, रावेत, मूळ – पन्हाळा) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवाकांत तिवारी (किवळे), मुस्सा गौस शेख (देहूरोड) आणि तिवारी यांचा कारचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी मुस्सा गौस शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
किवळे येथील जमीन विकसित करण्यासाठी आरोपी आणि जागा मालक यांच्यात डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचे काम फिर्यादीच्या मध्यस्थीने सुरू होते. ॲग्रीमेंट करण्यास विलंब होत असल्याने आरोपींनी फिर्यादीला रेस्टॉरंटजवळ बोलावून दमदाटी केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला टोयोटा हायरायडर कारमध्ये बळजबरीने बसवून मारहाण केली आणि त्यांच्याकडून एचडीएफसी बँकेच्या कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या. आरोपींनी फिर्यादीला दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विश्रांतवाडी येथे सोडले. या प्रकरणाचा रावेत पोलीस तपास करीत आहेत.
बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या
बहिणीसोबत संबंध असल्याच्या संशयातून तरुणाला कारने जोरदार धडक देऊन खाली पाडल्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी पाइपने डोक्यात घाव घालत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना वाघोलीतील बाजारतळ मैदानावर घडली आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. नवनाथ दिगंबर सोनार (रा. वाघोली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बाजारतळ मैदानात घडली आहे. याप्रकरणी रिक्षाचालक रामेश्वर साहेबराव माने (वय ३५) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.






