संग्रहित फोटो
छत्रपती संभाजीनगर : तुमच्या नावावरील मोबाइल क्रमांक वापरून मुंबईत बँक खाते उघडले असून त्यातून दहशतवादी कारवायांना निधी दिला जात आहे, असे सांगत ७५ वर्षीय महिलेला डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांचा गणवेश, मागे तिरंगा आणि पोलिसांचा झेंडा दाखवत क्राईम बँचचा धाक निर्माण केला. आरबीआयकडून खात्यांची तपासणी सुरू असल्याचे सांगून मुलाला अटक करण्याची तसेच कुटुंबाला इजा करण्याची धमकी देत १४ दिवसांत पाच बँक खात्यांतून आरटीजीएसद्वारे ३ कोटी ८० हजार रुपये वळवून घेतले. ही घटना १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान व्यंकटेशनगरात घडली आहे.
याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाइलवर एका क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने आपण नाशिक क्राईम ब्रँचमधून बोलत असून नाव राजन भिसे असल्याचे सांगितले. तुमच्या नावाचा मोबाइल क्रमांक कोणीतरी वापरत असून त्याद्वारे मुंबईतील कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले आहे. त्या खात्यातून दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवण्यात आला आहे, असे सांगून त्याने वृद्धेला घाबरवले. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने संबंधित खातेदाराला दोन कोटी रुपये मिळाले असून त्यातील कमिशनचे दोन लाख रुपये तुमच्या खात्यावर आल्याचे सांगितले. सर्व बँक खात्यांची माहिती आरबीआयकडून तपासली जाणार आहे. सहकार्य केले नाही तर अटक होईल; मुलालाही अटक केली जाईल, अशी भीती घातली. वृद्धेनी सांगतील तसे केले. वृद्धेची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
खाकीचा बनाव अन् मागे तिरंगा ध्वज
संशयितांनी व्हॉट्सअॅपवरून व्हिडीओ कॉल केला. समोरील व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात बसलेली होती. मागे तिरंगा आणि निळ्या रंगाचा पोलिसांचा झेंडा दिसत होता. त्यामुळे फोन करणारे खरोखरच पोलिस अधिकारी असल्याचा विश्वास वृद्धेला बसला. त्यानंतर १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान दररोज सकाळी, दुपारी आणि सायंकाळी त्यांना फोन केले जात होते.
असा झाला व्यवहार
२३ सप्टेंबर: देवगिरी नागरी सहकारी बँकेतून ६२ लाख रुपये
२८ सप्टेंबर : सेंट्रल बैंक ऑफ इंडियातून ८९ लाख रुपये
२९ सप्टेंबर : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून ५४ लाख रुपये
१ ऑक्टोबर : एचडीएफसी बँकेतून ५५ लाख रुपये
१ ऑक्टोबर: एसबीआयच्या खात्यातून ४० लाख ८० हजार रुपये
एकूण : ३ कोटी ८० हजार रुपये.
एफडीचीही माहिती घेतली वृद्धेकडून २१ सप्टेंबर रोजी संशयितांनी कुलकर्णी यांच्याकडील सर्व बँक व्यवहारांची माहिती घेतली. एफडी असल्याचे सांगत तिचीही खातरजमा केली. आरबीआयकडून तपास होणार असल्याचे सांगत आणि कुणाला काही सांगितल्यास कुटुंबाला इजा करण्याची धमकी दिली. वेगवेगळ्या बँक खात्यांतून सायबर भामट्यांनी सांगितलेल्या खात्यांवर आरटीजीएस करण्यास वृद्धेला भाग पाडले.
मुलाला अटक करण्याची धमकी
महिला घरी एकट्याच राहतात. त्यांचा मुलगा जामनगर येथे रिलायन्स कंपनीत नोकरीला असून मुलगी अमेरिकेत राहते. तुमच्या मुलालाही अटक करू तसेच कुटुंबाला इजा करण्याची धमकी देत सायबर भामट्यांनी त्यांना धमक्या दिल्या






