
गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; भरदिवसा ५५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या
रवींद्र चव्हाण हे सायंकाळी बालिकाश्रम रोड परिसरात असताना त्यांच्यावर किरकोळ वादातून हल्ला झाला. दोन अज्ञात व्यक्तींसोबत त्यांचा गाडीचा कट लागण्यावरून वाद झाला, असे सांगितले जाते. रागाच्या भरात या दोन अज्ञात व्यक्तींनी चव्हाण यांची चाकूने भोकसून हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चव्हाण यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
मृताचा मुलगा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा कार्यकर्ता असल्याची चर्चा आहे. या घटनेचे वृत्त समजताच चव्हाण यांच्या नातेवाईकांसह कार्यकर्त्यांनी घटनास्थळी व जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. आमदार जगताप यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. उपअधीक्षक दिलीप टिपरसे, तोफखाना पोलिस आणि एलसीबीचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयात तत्काळ बंदोबस्त वाढवण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. अज्ञात आरोपींची ओळख अद्याप पटलेली नसून, त्यांचा तपास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार
दारूच्या नशेत एकमेकांकडे पाहण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट हल्ल्यात झाले. दोघांनी मिळून डिलिव्हरी बॉय तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना रविवारी (४ ऑक्टोबर) रात्री उत्तमनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून, त्याच्या अल्पवयीन साथीदाराविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य गुलाब कांबळे (वय २३, रा. कोंढवे धावडे) असे जखमी डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. या प्रकरणी सागर प्रदीप कोठारी (वय २२, रा. इस्कॉन मंदिराजवळ, उत्तमनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. कोठारी याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन साथीदारावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आदित्य कांबळे यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.