संग्रहित फोटो
याप्रकरणी नवनाथ विलास चौरे, गोविंद बालकिसन चौरे, तुकाराम बाबासाहेब चौरे, विशाल जाधवर या चौघांविरोधात वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मयत महिला शहाबाई बाबुराव चौरे (वय ४०, माहेर शिरूर) हिचे १७ वर्षांपूर्वी तुकुचीवाडी येथील बाबुराव चौरे याच्यासोबत लग्न झाले होते. मात्र गेल्या ७ वर्षांपासून ती पतीसोबत न राहता जीवाचीवाडी येथील बाळ चौरे याच्यासोबत पत्नीसारखी राहत होती. दोन आठवड्यांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी तिचा खून करून प्रेत जीवाचीवाडी चिखलबीड (ता. वडवणी) हद्दीत पुरले होते. १२ ऑक्टोबर रोजी जंगली प्राण्यांनी ते प्रेत उकरून बाहेर काढल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेत ताब्यात घेतले होते.
अशी फुटली खुनाला वाचा
शहाबाई चौरे हिचे प्रेत गडबडीत व भीतीने खोल खड्ड्यात न पुरल्याने ते काही दिवसानंतर सडले आणि त्याच्या दुर्गंधीमुळे जंगली प्राण्यांनी ते प्रेत उकरून ओढत नेल्यामुळे या खून प्रकरणाचा उलगडा झाला.
असा लागला तपास
वडवणी पोलिस, केज पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करत सुरुवातीला दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर सखोल चौकशीत खरे आरोपी निष्पन्न झाले. आरोपींनी खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत एक दिवस भुस्कटात लपवून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी पोत्यात घालून निर्जन ठिकाणी पुरले. घाईगडबडीत खड्डा खोल न खणल्याने प्रेत सडून दुर्गंधी आली आणि प्राण्यांनी उकरल्याने हा खून उघडकीस आला.






