पुण्यात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; धक्कादायक कारणही आलं समोर
पुणे : छेडछाडीमुळे एका तरुणीने किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवा भागात ही घटना घडली असून, तरुणीला त्रास देऊन तिला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास भाग पाडणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २० वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुण तिचा पाठलाग करुन त्रास देत होता. माझ्याशी विवाह न केल्यास अपहरण करेल, तसेच तुझी छायाचित्रे सोशल मिडीयात प्रसारित करुन बदनामी करेल, अशी धमकी आरोपी तरुणाने दिली होती. आरोपीच्या त्रासामुळे घरी किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरुणीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांना याबाबतची माहिती रुग्णालयाने दिली. नंतर पोलीस रुग्णालयात पोहोचले. त्यांनी तरुणीचा जबाब नोंदविला. त्यानंतर गुन्हा दाखल केला. सहायक निरीक्षक सचिन थोरात तपास करत आहेत.
शाळकरी मुलीचा विनयभंग
चंदननगर भागात शाळकरी मुलीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणावर चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल केला. तक्रारदार मुलगी शाळेत जाताना आरोपी तरुण तिचा दुचाकीवरुन पाठलाग करायचा. तिच्याकडे मोबाइल नंबरची मागणी करुन तिला त्रास देत होता. मुलीने याबाबत तिच्या भावाकडे तक्रार दिली. तेव्हा आरोपीने भावाला धमकावून मारहाण केली. चंदननगर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
बदनामीकारक मजकुरामुळे तरुणाीचा विवाह मोडला
बदनामीकारक पत्रके वाटल्याने तरुणीचा विवाह मोडल्याची घटना उघडकीस आली. आरोपींनी बदनामी थांबविण्यासाठी तरुणीकडे १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास सोशल मिडीयात अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत तरुणीच्या भावाने लष्कर पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी आरोपी तरुणासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पत्नीवर चाकूने सपासप वार; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न
वाद-विवादातून पत्नीवर चाकूने सपासप वार करुन पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बाणेर भागात घडली आहे. या घटनेत महिलेसह तिचा पती गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नसीमा मुल्ला (वय ३२), अमजद युसुफ मुल्ला (वय ३९, रा. चेंबूर, विष्णूनगर, मुंबई) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत गणेश कचरु लंके (वय ३६, रा. ग्रॅव्हेंटाइन हाॅटेल, ज्युपिटर हाॅस्पिटलशेजारी, बाणेर) यांनी चतु:शृंगी (बाणेर) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.