अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक, तब्बल ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
ठाणे: ठाणे पूर्व रेल्वे स्थानकजवळील परिसरात चरस या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका आरोपीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने अटक करण्यात आली. या अटकेनंतर त्याच्याकडून सुमारे ३१ लाख ७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहंमद आफताब आलम मोहंमद सलीम अखतर (३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो बिहार येथील छपरा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसराजवळ मोहंमद आफताब आलम मोहंमद सलीम अखतर हा अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट ५ चे सहाय्यक पोलिस निरिक्षक भुषण शिंदे आणि पोलीस अमंलदार यांनी कोपरी पूर्व रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून मोहंमद याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून ३० लाख ९६ हजार रुपये किमतीचा ३ किलो ९६ ग्रॅम वजनाचे चरस हा अंमली पदार्थ आणि ११ हजार ५०० रुपयांचा मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण ३१ लाख ७ हजार ५००रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक-५चे सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगेपाटील हे करीत आहेत.
तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात बुधवारी सकाळी एक खळबळजनक खून प्रकरण समोर आले आहे, जिथे एका व्यक्तीने त्याच्या ५० वर्षीय मित्रावर विळ्याने हल्ला करून निर्घृणपणे हत्या केली. गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. ही घटना ठाण्यातील भाईंदर भागातील मुर्डे गावात घडली. ठाणे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यावेळी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे म्हणाले की, मृत काही दिवसांपूर्वी ३६ वर्षीय आरोपीसोबत राहायला आला होता. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की ही हत्या आरोपीच्या घरात झाली होती, जिथे त्याने पीडितेवर विळ्याने हल्ला केला.
हत्येच्या वेळी आवाज ऐकून काही शेजारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना ती व्यक्ती रक्ताने माखलेली दिसली. कोणी काही करण्यापूर्वीच आरोपी शस्त्र हलवत घटनास्थळावरून पळून गेला. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे म्हणाले की, सध्या आम्हाला घटनेमागील खरे कारण कळू शकलेले नाही. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १०३(१) (खून) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीचा शोध सुरू केला आहे.