पावसाळी पर्यटन जीवावर बेतले; धबधब्यात २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत (फोटो सौजन्य-X)
पावसाळी पर्यटन आणि पर्यटकांना विशेषतः युवा पिढीला आकर्षीत करणारे सह्याद्रीच्या उंच उंच डोंगर माथ्यांवरील त्या अनोळखी कड्या कपारीतून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आहे. या धुक्यासम पाण्याचे तुषार व येथील तुडुंब भरुन वाहत्या पाण्याचा प्रवाह आपल्या बेताल बिनधास्त वागण्याने कधी – कुठे – कसा – कोणाच्याही जीवावर बेतू शकेल हे सांगता येत नाही. अशी एक दुर्दैवी घटना माणगांव तालुक्यातील चन्नाट गावच्या धबधब्याच्या डोहात सोमवार (३० जून) रोजी सायंकाळी घडली आहे.
मुंबई येथील २२ वर्षीय ऋषी वासुदेव पथिपका या युवा पर्यटकाचा चन्नाट धबधब्याखाली नदीमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. रायगड मधिल या ठिकाणी एकत्र पर्यटनास आलेल्या तरुणाने आपला मित्र पाण्यात बुडाल्याने हरवला असल्याची फिर्याद माणगांव पोलील ठाण्यात केली. बुडालेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी १ जुलै रोजी सकाळी शोधण्यात आला व मृतदेह बाहेर काढण्यासाठी कोलाड व माणगांव येथील बचाव पथकातील सदस्यांना अत्यंत कठीण आणि जिकरीचे धोकादायक डेड बॉडी रिकव्हरी ऑपरेशन पार पाडावे लागले आहे.
एस.व्ही.आर.एस.एस. कोलाड रेस्क्यू टीम चे सागर दहींबेकर, प्रयाग बामुगडे, निलेश लोखंडे, श्वेता विश्वकर्मा, शुभम सणस, सुनील सावंत, अनुप देशमुख, देवेन रटाटे, सिद्धार्थ पवार, अविनाश वाघे, मनोज थिटे, दमेश तांबट, आदेश पाटेकर, शशांक दोडामानी आणि भरत मालुसरे तर शेलार मामा रेस्क्यू टीम भिरा पाटणूस चे प्रशांत शेलार, शेलार मामा, रुपेश शेलार, संतोष बांदल, मजीत कागदी व माणगावमधून वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर, सागर पाटील, प्रतीक मोरे, शुभांकर वनारसे व चन्नाट गावचे ग्रामस्थ अनिल कुले, नमन मांडवकर, बाबू मांडवकर, श्रीराम थोरे, मनोहर धाडवे, सहदेव सुतार, मधुकर दिवेकर, काशिनाथ तांदळेकर, गौतम घाग, विपुल भोसले, किरण दिवाले, संदीप दिवेकर, विक्रम तांदळेकर, शंकर पवार व माणगांव पोलीस शिपाई दत्ता पवार आणि काळे या सर्वांनी टीमवर्कने अतिशय जोखमीचे रिकव्हरी ऑपरेशन पार पाडले.
आपल्याला माहिती नसलेल्या ठिकाणी स्वैर, मौज, मजा-मस्ती करणे, पाण्यात डुंबणे जीवावर बेतू शकते अशी दरवर्षी उदाहरणे माहीती असूनही मस्त बिनधास्त मद्यधुंद अतिउत्साही वागणे किती महागात पडते? त्या सोबतच आपल्या कुटुंबातील आपले आई-वडील व जवळील माणसांना त्याचा किती मनस्ताप व त्रास होतो तसेच अतीव दुःख सहन करावे लागते हे भान आपल्या या जोशपूर्ण अती उत्साही युवा पिढीस उरले नाही असे ह्या दुर्दैवी घटनांना अनुसरून लोक म्हणत आहेत.
अशा दुर्दैवी घटना आपण अलिकडे नेहमीच अनुभवत आहोत. प्रशासनाने अशा धोकादायक ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जारी करूनही या भयंकर पावसाळ्यात चोरी-छिपे रिल्सच्या नादात, रिल्सच्या अतिरेकी प्रभावाने दिवसेंदिवस असे पर्यटन अधिक धोकादायक असल्याचेच चित्र स्पष्ट होत आहे. चुकून धोकादायक ठिकाणी दुर्दैवाने कोणी वाहून गेले बुडाले तर बचाव करणारे बचावपथकातील सदस्य देखील आपला प्राण धोक्यात घालून कार्य करत असतात.
खरतर स्थानिक प्रशासनाने गावातील अशा धोकादायक पर्यटन स्थळांवर स्थानिक ग्राम पंचायत पुढाकाराने तसेच पोलीस प्रशासनाने धोक्याची सूचना देणारे व परिसराची वा ठिकाणची माहीती दर्शविणारे सुस्पष्ट कायमस्वरूपी फलक पर्यटकांस वाचता येतील असे ठीकठिकाणी लावून जनजागृती करावी याची दखल जिल्हा प्रशासनाकडून देखील घेण्यात यावी अशी मागणी बचाव पथकातील सदस्यांकडून होत आहे.