हैद्राबाद : प्रेषित मोहम्मद (Prophet Mohammed) यांच्याबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी अटक (Arrest) झालेले तेलंगणाचे (Telangana) भाजप आमदार टी. राजा सिंह (BJP Mla T. Raja Singh) यांच्या पोलीस कोठडीची (Police Custody) विनंती न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. भाजपने राजा सिंह यांना निलंबित केले असले तरी ते पक्ष कार्यालयात पोहोचताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
आमदार राजा सिंह यांना पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. हैदराबादच्या दक्षिण विभागाचे पोलीस उपायुक्त पी. साई चैतन्य यांनी सांगितले की, टी. राजा सिंह यांच्याविरुद्ध धार्मिक श्रद्धेच्या अपमानाशी संबंधित कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री शहर पोलीस आयुक्त सीव्ही आनंद यांच्या कार्यालयात आणि हैदराबादच्या इतर भागांमध्ये राजा सिंह यांनी अपमानास्पद टिप्पणी करणारा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर निदर्शने सुरू झाली. त्यानंतर वेगवेगळ्या भागांतून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. राजा सिंह यांनी समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे आंदोलकांनी सांगितले आणि त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणीही केली. त्यानंतर त्यांना अटक केली होती.
हैदराबादमधील गोशामहलचे आमदार टी. राजा सिंह यांनीही गेल्या आठवड्यात एका कॉमेडी शोमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याने ते चर्चेत आले होते. स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा कार्यक्रम रद्द करण्यासाठी ५० समर्थकांसह कार्यक्रमस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी त्याला प्रतिबंधात्मक ताब्यात घेतले होते.