कोयता फिरवून दहशत माजवणाऱ्यांना अटक (फोटो- सोशल मिडिया)
कदमवाकवस्ती: कोणी येथे थांबला तर आज जिवंत सोडणार नाही, आम्ही इथले भाई आहोत!अशी धमकी देत हवेत कोयता फिरवून दहशत माजवणा-यां दोन तरुणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. सदर घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पांडवदंड रस्त्यावरील गोल्ड सिटी जवळ गुरुवार (२६ जून) रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी ॲड ओंकार मच्छिद्र कामठे (वय ३०, रा. पांडवदंड फुरसुंगी ता हवेली जि पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सचिन किसन राठोड (वय २१), प्रतिक बाळासाहेब शिंदे (वय २२) व नैतीक बाळासाहेब शिंदे ( तिघेही रा. पठारे वस्ती लोणी काळभोर ता हवेली जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी सचिन राठोड व प्रतिक शिंदे या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार कामठे हे वकील असून ते कुटुंबासोबत कदमवाकवस्ती परिसरात राहतात. ते गुरुवारी घरी असताना, त्यांना अचानक घरासमोर आरडओरडा सुरु असल्याचा आवाज आला. त्यावेळी त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, सचिन राठोड, प्रतिक व नैतीक शिंदे हे तिघेजण मोठमोठ्याने शिवीगाळ करीत होते.
तसेच हवेत कोयता फिरवत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. काही नागरिकांनी सचिन राठोड व प्रतिक शिंदे यांना पकडले. व दोघानाही चांगला चोप दिला. यावेळी नैतीक शिंदे हा दुचाकीवरून पळून जाण्यास यशस्वी झाला.या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे करीत आहेत.