NSG कमांडोच चालवत होता ड्रग्जचे रॅकेट; 26/11च्या हल्ल्याशी आहे खास कनेक्शन
Bajrang Singh NSG Commando Arrest: अंमली पदार्थ विरोधी पथक आणि राजस्थान दहशतवाद विरोधी पथकान केलेल्या संयुक्त कारवाईत पोलिसांनी बजरंग सिंगला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बजरंग सिंग हा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे एनएसजी चा कमांडो होता. २६/११ ला मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावेळी तो ताज हॉटेलवर झालेल्या एनएसजीच्या कारवाईत सहभागी होता. ओडिसा आणि तेलंगाणा राज्यांतून गांजा आणून तो राजस्थानमध्ये त्याच नेटवर्क चालवत होता.
राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील रहिवासी असलेले बजरंग सिंग यांनी दहावीनंतर शिक्षण सोडले आणि सीमा सुरक्षा दलात (BSF) भरती झाले. नंतर ते राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) मध्ये सामील झाले आणि २००८ च्या मुंबई हल्ल्यात (२६/११ दहशतवादी हल्ला) या एलिट फोर्सच्या दहशतवादविरोधी कारवायांचा भाग होते. त्या हल्ल्यात, पाकिस्तान पुरस्कृत लष्कर-ए-तैयबा (LeT) च्या दहशतवाद्यांनी २६ ते २९ नोव्हेंबर २००८ या चार दिवसांच्या कालावधीत मुंबईत अनेक दहशतवादी हल्ले केले, ज्यात २६ परदेशी नागरिकांसह किमान १६६ लोक ठार झाले.
बजरंग सिंगने सात वर्षे एनएसजी कमांडो म्हणून काम केले आणि त्याच्या सेवेनंतर त्याने राजकीय महत्त्वाकांक्षा जोपासण्यास सुरुवात केली. २०२१ मध्ये त्याने त्याच्या पत्नीला स्थानिक निवडणुका लढवण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मते, हा प्रयत्न अयशस्वी झाला, परंतु त्यामुळे सिंगचा प्रभाव वाढला आणि त्याला प्रसिद्धी मिळाली, ज्याचा वापर त्याने नंतर त्याचे आंतरराज्यीय ड्रग्ज साम्राज्य उभारण्यासाठी केला.
पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) विकास कुमार यांनी पीटीआयला माहिती देताना सांगितले की, बजरंग सिंगने ओडिशा आणि राजस्थानमधील गुन्हेगारी टोळ्यांशी संपर्क साधण्यासाठी आपल्या नव्याने मिळालेल्या प्रभावाचा वापर केला होता. त्याने आपल्या गावाच्या परिसराचा गैरफायदा घेत, ड्रग्ज आणि दहशतवादाशी संबंधित कारवाया वाढवण्याचा प्रयत्न केला. या अटक कारवाईमागे अनेक आठवड्यांचे सखोल नियोजन आणि गुप्तचर यंत्रणांमधील माहितीची देवाणघेवाण होती. बजरंग सिंगसारख्या कुख्यात गुन्हेगार व ड्रग्ज तस्कराला गजाआड करणं, राजस्थानमधील दहशतवाद-ड्रग्ज संबंध निष्प्रभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.
बजरंग हा ओडिशा आणि तेलंगणा येथून गांजा आणून राजस्थानमध्ये त्याचे नेटवर्क चालवत होता. त्याच्यावर २५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी यासाठी बजरंग मोबाईल फोन फार कमी प्रमाणात वापरत असे. तो एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नसे. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर राजस्थानच्या एटीएसने त्याला अटक केली. कारवाईदरम्यान त्याच्याकडून २०० किलो गांजा जप्त करण्यात आला. बजरंगचा निर्भड स्वभाव आणि ओडिशा-तेलंगणा राज्यातील संपर्कांमुळे त्याने राजस्थानमध्ये नेटवर्क तयार केले होते, अशी माहिती आयजी विकास कुमार यांनी दिली.