भाईंदर/ विजय काते :-भाईंदर पूर्वेतील साईबाबा नगर परिसरात २०१२ साली घडलेल्या अत्यंत निघृण खुनप्रकरणी तब्बल १३ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अखेर दिल्ली येथून अटक करण्यात गुन्हे शाखा, कक्ष १ काशिमीरा यांना मोठे यश मिळाले आहे.ही घटना दिनांक २८ मे २०१२ रोजी रात्री १० वाजल्याच्या सुमारास घडली होती. सुरेशकुमार सूर्यनारायण चौधरी (वय ३५) या इसमाचा त्याच्या राहत्या घरात अज्ञात कारणावरून खून करण्यात आला होता. आरोपीने सुरेशकुमार यांचा गळा इलेक्ट्रिक वायरने गळा आवळून, तोंडावर चिकटपट्टी लावली. त्यानंतर खलबत्त्याच्या लोखंडी दांड्याने डोक्यावर व तोंडावर मारहाण केली. त्याचबरोबर कटर व इतर धारदार हत्याराने चेहरा, छाती, पोट, हात व गुप्तांगावर वार करत निर्घृणपणे हत्या केली होती.
या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा केल्यानंतर संबंधित आरोपी आपली ओळख लपवून बिहार व दिल्ली येथे फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी बिहारमध्ये शोधमोहीम राबवली, मात्र तो मिळून आला नव्हता.
दरम्यान, गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा यांनी सदर प्रकरणाचा समांतर तपास सुरू ठेवला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणानंतर, आरोपी गोविंद कुमार हरक ऊर्फ जगतनारायण चौधरी (वय ३४, रा. नवा बाजार, नवी दिल्ली) याला दिल्ली येथून कौशल्यपूर्ण पद्धतीने अटक करण्यात आली.प्राथमिक चौकशीत त्याचा या खुनात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, तो गेली १३ वर्षे वेगवेगळ्या नावाने बिहार व दिल्लीमध्ये वास्तव्य करत होता.
आरोपीस नवघर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्हा रजि. क्र. १२०/२०१२, भा.दं.सं. ३०२ अंतर्गत हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पुढील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:मधुकर पांडे (पोलीस आयुक्त), दत्तात्रय शिंदे (अप्पर पोलीस आयुक्त), अविनाश अंबुरे (पोलीस उपायुक्त – गुन्हे), मदन बल्लाळ (सहाय्यक पोलीस आयुक्त – गुन्हे शाखा) यांच्यासह पोनि. प्रमोद बडाख, सपोनि. सचिन सानप, पोउपनि. उमेश भागवत, संदीप शिंदे, अशोक पाटील, अविनाश गजे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, पो.हवा. मनोज चव्हाण, सचिन हुले, सुधीर खोत, अश्विन पाटील, सनी सूर्यवंशी, पो.शि. प्रशांत विसपुते, गौरव बारी, सौरभ इंगळे, धीरज मॅगाणे, किरण आसवले आणि सायबर गुन्हे शाखेचे स. फौज. संतोष चव्हाण यांनी परिश्रम घेतले.