फोटो - टीम नवराष्ट्र
नंदुरबार : राज्यभरामध्ये पैगंबर जयंती मुस्लीम बांधवांकडून उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. मात्र नंदूरबारमध्ये ईदला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. ईदच्या जूलुस दरम्यान दोन गटात तुंबऴ हाणामारी झाली. यामुळे दंगल परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेमुळे नंदुरबारमध्ये तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली असून परिसरावर लक्ष ठेवण्यात आले आहे.
पैगंबर जयंतीनिमित्त आज नंदुरबार शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. या दरम्यान दोन गटात वाद निर्माण झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला. काही भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मोटरसायकलींची नासधूस करण्यात आली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तणाव मिटला. आता नंदुरबार शहरात तणावपूर्ण शांतता असून मोठ्या संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तान तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही अफवा पसरवू नये अफवा पसरवण्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिले आहेत.
नंदुरबार शहरात ईदच्या जूलुस दरम्यान दोन गटात दंगल झाली. या परिस्थितीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आढावा घेतला आहे. रात्री उशिरा नंदुरबारमध्ये दाखल होत त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली आहे. तसेच त्यांनी शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेत या दंगलीतील उपद्रव्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच या दंगलीच्या अनुषंगाने काही व्हिडिओ किंवा फोटो जर नागरिकांकडे असेल तर त्यांनी ते पोलीस दलाला देण्याचे आवाहन त्यांनी केले. हे व्हिडिओ व फोटो पोलिसांना देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस असा मोठा फौज फाटा होता. विशेष म्हणजे आज एकाच दिवसात उत्तर महाराष्ट्रात तीन शहरांमध्ये अशा पद्धतीने ईदच्या जुलूसा दरम्यान दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील घटनांमध्ये काही कनेक्शन आहेत का याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना विचारणा केली असता त्याबाबत आम्ही तपास करू असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.