फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा : व्हॅलेंटाईन डेची मुळे प्राचीन रोमन सण Lupercalia मध्ये आढळतात. १५ फेब्रुवारीला साजरा होणारा हा उत्सव वसंतऋतू आणि सुपीकतेशी संबंधित होता. पाचव्या शतकात ख्रिश्चन चर्चने संत Saint Valentine यांच्या स्मरणार्थ १४ फेब्रुवारी हा दिवस अधिकृत केला. पुढे १५व्या शतकात कवी Geoffrey Chaucer यांनी या दिवसाला रोमान्सशी जोडले आणि तो प्रणयदिन म्हणून रूढ झाला.
पूर्वी प्रेम व्यक्त करण्यासाठी हाताने लिहिलेली पत्रे, गुलाबाचे फूल आणि प्रत्यक्ष भेट यांनाच विशेष महत्त्व होते. संत व्हॅलेंटाईन यांनी सम्राट Claudius II यांच्या विवाहबंदीला न जुमानता तरुणांचे विवाह लावून दिल्याची दंतकथा प्रसिद्ध आहे. त्यामुळे प्रेम, त्याग आणि बांधिलकी यांचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जाऊ लागला.
मात्र काळानुरूप प्रेमाच्या अभिव्यक्तीची पद्धत आमूलाग्र बदलली आहे. एकेकाळी “कबूतर जा…” सारख्या कल्पनारम्य संदेशांपासून सुरू झालेला प्रवास आता डिजिटल युगात पोहोचला आहे. प्रेमपत्रांची जागा मेसेजने घेतली आहे. आकर्षक भेटकार्ड, म्युझिकल कार्ड्स आणि गिफ्ट्स याही मागे पडल्या आहेत. आज इन्स्टाग्राम रील्स, फेसबुक पोस्ट्स, व्हॉट्सअॅप स्टेटस आणि व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केले जाते. “हार्ट” इमोजीपासून खास एडिट केलेल्या व्हिडिओपर्यंत प्रेमाची भाषा अधिक तात्काळ आणि सार्वजनिक झाली आहे.
व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने ७ फेब्रुवारी रोजी ‘रोज डे’, ८ फेब्रुवारी ‘प्रपोज डे’, ९ फेब्रुवारी ‘चॉकलेट डे’, १० फेब्रुवारी ‘टेडी डे’, ११ फेब्रुवारी ‘प्रॉमिस डे’, १२ फेब्रुवारी ‘हग डे’, १३ फेब्रुवारी ‘किस डे’ आणि १४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ असे विविध दिवस साजरे केले जातात. प्रत्येक दिवस प्रेमाच्या वेगवेगळ्या भावनांना अधोरेखित करतो.
तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढलेल्या युगात प्रेम अधिक खुलं, झटपट आणि डिजिटल झालं आहे. मात्र बदलत्या माध्यमांमध्येही भावनांची खरी उब टिकवणं तितकंच महत्त्वाचं आहे. प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बदलली असली तरी त्यामागील प्रामाणिकपणा, जिव्हाळा आणि आपुलकी कायम राहणं हीच खरी गरज आहे.






