वसई/ रविंद्र माने: विरार पश्चिमेच्या बोळींज येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मृत तरुणाच्या वडिलांनी केला आहे.
विराच्या बोळींज येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी संध्याकाळी काम संपल्यावर कामगार घरी गेले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास सुऱक्षारक्षकाला इमारतीच्या उंच मजल्यावरून खाली काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यामुळे त्याने आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता दोन मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याला दिसले.
या घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी अर्नाळा सागरी पोलिसांनी धाव घेतली. त्यांनी सुरुवातीलाच या मुलांची ओळख पटवण्यात यश मिळवले. शाम घोरई (20) आणि आदित्य रामसिंग (21) अशी या मुलांची नावे आहेत. त्यानंतर पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. त्यांच्या मृतदेहाजवळ आत्महत्या प्रकरणी कोणतीही चिठ्ठी न सापडल्यामुळे आत्महत्याचे कारण समजू शकले नाही.
ही दोन्ही मुले नालासोपारा येथील आचोळे परिसरात रहात होती तर दोघेही नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्गात शिक्षण घेत होते. त्यांनी आत्महत्या का केली याचा तपास केला जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप यातील एका मुलाच्या वडिलांनी केला आहे. सोमवारी सकाळी जतीन नावाचा त्यांचा मित्र घरी आला होता. त्याने फिरायला जाऊ असे सांगून त्यांना नेले होते. दुपारी सव्वा तीन वाजेपर्यंत या तिघांचेही मोबाईल सुरू होते.त्यानंतर फक्त जतींनचा मोबाईल रात्री नऊ नंतर सुरू झाला. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास करावा अशी मागणी त्यांनी केले आहे.
याप्रकरणी अर्नाळा पोलीसांचा तपास सुरु असून ही हत्या आहे की आत्महत्या हेअद्याप सिद्ध झालेलं नाही. मात्र जर आत्महत्याच करायची होती तर या दोन्ही मुलांनी चिठ्ठी का लिहिली नाही किंवा असा कोणताही पुरावा जो ही आत्महत्या असल्याचं सिद्ध करेन असे कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाही. दरम्यान हे प्रकरण अत्यंत संवेदनशील होत असून या प्रकरणी परिसरात मोठी खळबळ माजली आहे.