
'क्राईम पेट्रोल' पाहून बाप लेकानं आखला कट! (Photo Credit - AI)
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): मालकाच्या डोळ्यात विश्वासाचे धूळफेक करणारा चालकच २७ लाखांच्या रोकडचोरीचा सूत्रधार निघाला आहे. चालकाच्या मुलाने आखलेल्या योजनेनुसार वडिलांनी नाट्यमयरित्या स्वतःवर हल्ला झाल्याचे भासवत चोरी घडवून आणली. पोलिसांनी केलेल्या तपासात ही घटना उघडकीस आली असून प्रकरणात पोलिसांनी कट रचणाऱ्या मुलासह वाहन चालकाला बेड्या ठोकल्या.
चालक गणेश ओंकारराव शिंदे (४८, रा. बदनापूर, जि. जालना) आणि कट रचणारा त्याचा मुलगा अमोल गणेश शिदि (दोघे रा. बदनापुर जि. जालना) अशी अटक आरोपींची नावे असून त्यांनी चोरलेल्या रक्कमेपैकी २५ लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. प्रकरणात दिनेश राधेशाम साबु (४५, रा. मंगलधाम स्वर संगन सोसायटी, न्यु श्रेयनगर, उस्मानपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आयकॉन स्टील कंपनी, जालना एमआयडीसी येथे नोकरी करतात.
२८ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता, साबु यांनी चालक गणेश शिंदे याला २७ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या दुकानदारांकडून गोळा केलेली २७ लाख ५ हजार ९१० रुपयांची रोख रक्कम गाडीत ठेवण्यास सांगितले, गणेश शिंदे हा पैसे घेऊन कारमध्ये पैसे ठेवत असताना, दोन अज्ञात व्यक्तींनी पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला; विरोध केल्यावर गणेशच्या हातावर कटरने वार केला गेला व डोळ्यात मिरची पावडर टाकत आरोपी पसार झाले. प्रकरणात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होते. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर व त्यांच्या पथकाने केलेल्या तपासात चालकाने दिलेल्या विसंगत जबाबांमुळे त्यावर संशय उत्पन्न झाला. कसून चौकशी करताच गणेश याचा मुलगा अमोल शिंदे याने कट रचल्याची कबुली दिली.
पोलिसांनी अमोलला ताब्यात घेत चौकशी केली असता, गणेश याने काही महिन्यांपूर्वी घर बांधले असून त्याची पत्नी देखील अत्यंत बिमार असल्याने त्याच्यावर १० ते १५ लाखांचे कर्ज झाले होते. या कर्जाची परतफेडी साठी हा सर्व कट रचण्यात आल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता अमोलला बेड्या ठोकल्या.
अमोल याने कबुली दिली की, डोक्यावर वाढते कर्ज असल्याने आणि आई अत्यंत बिमार यामुळे त्यांना पैशांची अत्यंत गरज होती. यासाठी गणेशने अमोलला पैसे कधी आणि कोठून येतात आणि कोठे जमा होतात. याची माहिती दिली होती. अमोल याने क्राईम पेट्रोल पाहून कट रचला. व गणेशने दिलेल्या माहिती आधारे अमोल याने काम फत्ते केले. तर कटा नुसार गणेशने स्वतःवर कटरने वार करुन आपल्याला छुटमार झाल्याचा बनाव कला होता.