छत्रपती संभाजीनगरमध्ये 'टॅक्स घोटाळा' कॉल सेंटरचा पर्दाफाश! (Photo Credit - AI)
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): हेराफेरी करून नागरिकांना गंडवण्याचे काम कॉल सेंटरच्या माध्यमातून केले जात असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. मात्र, यावेळी अमेरिकेतील नागरिकांना त्यांचा लागलेला टॅक्स (कर) कमी करून देण्याच्या नावाखाली लाखो डॉलरची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. मंगळवारी सकाळपासून सुरू केलेल्या कारवाईत पोलिसांनी ११२ तरुणींसह कॉल सेंटरच्या चालकांना उशिरा रात्रीपर्यंत ताब्यात घेतले आहे.
पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांच्या तक्रारीनुसार, चिकलठाणा एमआयडीसी, टी ७ येथील एका तीन मजली इमारतीत ‘के. एस. इंटरप्राईजेस’ नावाचे एक अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरू होते. या कॉल सेंटरमधून अमेरिकेत राहणाऱ्या नागरिकांना इंटरनेटद्वारे संपर्क साधला जात होता. त्यांना जास्त टॅक्स आल्याचे सांगून, टॅक्स कमी करण्यासाठी विविध आमिष दाखवली जात होती. टॅक्समध्ये बचत करण्याच्या नावाखाली त्यांना काही गिफ्ट खरेदी करण्यास सांगितले जाई आणि त्या गिफ्टवरील कोडच्या आधारे डॉलरच्या रूपात त्यांची लाखो डॉलरने फसवणूक केली जात होती.
या कारवाईत ताब्यात घेतलेल्या ११२ कर्मचाऱ्यांसह सहा जणांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने कॉल सेंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. तर, कंपनीचा व्यवहार सांभाळणाऱ्या सहा जणांना न्यायालयाने पोलिस कोठडीचे आदेश सुनावले.
Nashik News: विधिसंघर्षित बालकांचे पालकही रडारवर, पोलिसांनी घेतली कठोर भूमिका
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, या कॉल सेंटरचे चालक गुजरात येथील आहेत. कॉल सेंटर सुरू असलेली जागा मात्र दिल्लीत राहणाऱ्या एका मराठी व्यक्तीची आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत कंपनी चालवणाऱ्या संचालक मंडळाने जागा मालकाशी केलेला ५८ पानी करार पोलिसांच्या हाती लागला आहे. या करारामध्ये कॉल सेंटरमध्ये आयटी कंपनीचे आणि सॉफ्टवेअरचे काम करणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
काही महिन्यांपूर्वी इगतपुरी येथे अमेरिकेसह इतर देशांतील नागरिकांना ऑनलाईन लुटणाऱ्या टोळीला अटक झाली होती. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे आंतरराष्ट्रीय फसवणूक करणाऱ्या टोळीला पकडण्यात स्थानिक पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईसाठी पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, रत्नाकर नवले, पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त मनोज पगारे यांच्यासह सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल येरमे, दामिनी पथक आणि रॅपिड ॲक्शन फोर्सचे कर्मचारी उपस्थित होते.






