सांस्कृतिक शहरात गुन्हेगारीच्या टोळ्यांचे ‘शतक’! प्रमुख टोळ्या कोणत्या?
पुणे/अक्षय फाटक : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या लेखीत पुणे शहरात ११ प्रमुख टोळ्या व ८७ ‘रायझिंग’ टोळ्या असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या रायझिंग टोळ्यांची संख्या गेल्या वर्षभरात वाढल्याचे देखील दिसत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांचे ‘टोळ्यां’चा बिमोड करण्याचे स्वप्न हे सातत्याने दिव्यच राहत असल्याचे परिस्थितीवरून तरी दिसत आहे. दिवसेंदिवस टोळ्यांची संख्या अन् गुन्हेगारीचं वलय वाढत असल्याचेही यावरून दिसत आहे.
कोथरूड परिसरात झालेल्या एका तरुणाला मारहाण प्रकरणानंतर पुण्यातील गुंड व त्यांच्या टोळ्यांविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. गुंड गजा मारणे याच्या टोळीतील गुंडाकडून तरुणाला मारहाण झाली. याप्रकरणाने पुण्यातील पोलिसांच्या कामाजावरच प्रश्न उपस्थित केले गेले. नंतर मात्र, पोलिसांनी धडक कारवाईच सुरू करून गुन्हेगारी आता संपवूनच टाकू अशा जोमाने मोक्का कारवाई केली. त्यांच्या मालमत्ता तसेच वाहनांची माहिती देखील घेतली.
शहरातील गुन्हेगारी टोळ्यांबाबत कोणाला काही तक्रार करायची असल्यास पोलिसांनी एक स्वतंत्र कक्ष देखील सुरू केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. गुन्हे शाखेकडे या कक्षाचे कामकाज दिले आहे. परंतु, गेल्या काही वर्षात पुण्यातील टोळ्यांचे अस्तित्व मोडीत निघण्यापेक्षा वाढत चालले असल्याचे वास्तव आहे. टोळ्यांची संख्या देखील वाढत असून, नवीन तरुणांचा भरणा करून गल्ली तसेच विभागानुसार टोळ्या झाल्या आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलांसह ऐन तारूण्यातील तरुणांचा भरणा असल्याने त्यांना पोलिसांसह कोणाचीच भिती नसल्याचेही वास्तव आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ११ टोळ्या या प्रमुख असल्याची नोंद होती. तर, ३२ रायझिंग टोळ्या असल्याचे नोंद होती. परंतु, आता हीच रायझिंग टोळ्यांची हीच नोंद थेट ३२ वरून ८७ वर गेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात पुण्यात टोळ्या सुरू झाल्याचे वास्तव समोर आले आहे. प्रमुख ११ टोळ्यांमध्ये ५ टोळ्या निष्क्रिय आहेत. तर सहा टोळ्या अॅक्टीव्ह असल्याचे सांगितले जाते.
रायझिंग टोळ्यात तरूणाईचा भरणा
शहरात नव्याने उदयास आलेल्या या ८७ रायझिंग टोळ्यांमध्ये अल्पवयीन मुलांसह ऐन तारूण्यात आलेली मुले असल्याचे भीषण वास्तव आहे. हे तरुण पोलिसांसह कोणालाच भित नसल्याचेही सांगितले जाते. तेवढ्यापुरते त्यांच्याकडून नरमाईची भूमिका पार पाडली जाते. पण, एकदा का बाहेर आल्यानंतर पुन्हा ते भाईगिरीच्या आवेशातच परिसरात वावरत असल्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे या नव्या टोळ्यांना लगाम लावयचा कसा असा प्रश्न पोलिसांसमोर आले आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश टोळ्यांचे म्होरके हे विस ते पंचवीस वयोगटातील आहेत.
प्रमुख टोळ्या कोणत्या आहेत?
प्रामुख्याने बंडू आंदेकर, बाबा बोडके, गजा मारणे, उमेश चव्हाण, नीलेश घायवळ, गणेश मारणे, संदीप-शरद मोहोळ, बंटी पवार, बापू नायर, अन्वर नव्वा आणि वसीम खडा यांच्या टोळ्या होत्या. अलिकडच्या काळात गुन्हेगारी क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली आहे. मोहोळ टोळीचा म्होरक्या शरद मोहोळचा खून झाला. त्यामुळे ही टोळी सध्या बिथरलेल्या अवस्थेत आहे. परंतु, टोळीतील नवीन भरती झालेल्या काहींकडून मोठी पावले उचलली जाण्याची दाट शक्यता आहे. अन्वर नव्वा, वसीम खडा यांचाही खून झाला. त्यामुळे सद्य परिस्थितीत आंदेकर, गजा मारणे, गणेश मारणे, घायवळ, पवार आणि नायर या टोळ्या सक्रिय आहेत.