धक्कादायक ! सीआरपीएफ जवानाचा विवाहितेवर अत्याचार; चार लाखही उकळले, 'ते' फोटो-व्हिडिओ व्हायरल करतो म्हटला अन्... (File Photo : Crime)
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता अमरावतीत एका महिलेवर अत्याचार करून तिला ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी राज्य राखीव पोलिस दलातील (SRPF) एका जवानासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आरोपी सुनील अशोक राठोड (वय ४०, अमरावती) आणि नितीन भिका राठोड (वय ३८, ठाणे शहर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य आरोपी सुनील राठोड हा एसआरपीएफ ग्रुप क्रमांक ९ मध्ये कार्यरत आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये तो पीडित महिलेच्या घरी गेला आणि मद्यधुंद अवस्थेत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. भीतीपोटी पीडितेने सुरुवातीला ही बाब कुणालाही सांगितली नाही.
ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू
घटनेनंतर काही महिन्यांनी आरोपीने पुन्हा पीडितेला त्रास देण्यास सुरुवात केली. तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ आपल्याजवळ असल्याचे सांगून ते तिच्या पती व नातेवाईकांना दाखवून बदनाम करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्रस्त झालेल्या पीडितेने सुनील राठोडचा मोबाईल क्रमांक ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. त्यानंतर आरोपीचा मित्र नितीन राठोडही या कटात सहभागी झाला.
अश्लील शिवीगाळ व मारण्याची धमकी
आरोपी सुनील राठोड हा पीडितेला सतत अश्लील शिवीगाळ करत होता आणि तिच्या पतीला गोळी घालून ठार मारण्याची धमकी देत होता. पीडितेला दोन वेळा मारहाणही करण्यात आली. सततच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली. फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, सात वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ठाण्यातील एका कन्स्ट्रक्शन साईटवर घडली. या प्रकरणाने पुन्हा एकदा महिलांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.






