
दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये सक्रिय असलेल्या अनेक गुन्हेगारी टोळ्यांचे स्थानिक पातळीवर संपर्क आणि मदतनीसांचे जाळे असल्याचे तपासात यापूर्वी समोर आले आहे. काही स्थानिक गुन्हेगार, व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती आणि मध्यस्थांकडून माहिती परदेशात असलेल्या टोळीतील सदस्यांपर्यंत पोहोचत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. टार्गेट व्यक्तीचा व्यवसाय, आर्थिक क्षमता, कुटुंबाची माहिती, पत्ता आणि संपर्क क्रमांक अशी माहिती या नेटवर्कमार्फत मिळवली जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दिल्ली-एनसीआरसह पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी नेटवर्कमध्येही परस्पर संपर्क असल्याचे तपास यंत्रणांचे निरीक्षण आहे.
पोलिसांच्या मते, खंडणी हा अशा टोळ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असतो. टोळीतील सदस्य देशात असोत किंवा परदेशात, त्यांच्यासाठी पैसा, स्थानिक संपर्क आणि गुन्ह्यांसाठी आवश्यक साधनांची व्यवस्था केली जाते. खंडणीची रक्कम विविध मध्यस्थांमार्फत फिरवली जात असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. काही प्रकरणांत हवाला आणि क्रिप्टोकरन्सीशी संबंधित व्यवहारांचा वापर होत असल्याचा पोलिसांचा संशय असतो. मिळालेल्या पैशाचा वापर टोळीचे नेटवर्क चालवणे आणि विविध बेकायदेशीर व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सिव्हिल लाइन्स प्रकरणातील महिलेची पोलिसांनी चौकशी केली असता, तिच्या कुटुंबातील काही जुन्या वादांची माहिती समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. महिलेच्या सासऱ्यांच्या निधनानंतर कुटुंबात वाद झाल्याची बाबही तपासात पुढे आली आहे. त्यामुळे धमकीचा संबंध या कौटुंबिक वादाशी आहे का, याचाही तपास केला जात आहे. महिलेची आणि तिच्या कुटुंबाची माहिती कॉल करणाऱ्या व्यक्तीपर्यंत नेमकी कोणी पोहोचवली, याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
पोलिसांकडून कॉलचे तांत्रिक विश्लेषण केले जात आहे. कॉल इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात आला होता की परदेशी मोबाइल नेटवर्कचा वापर झाला, याची पडताळणी सुरू आहे. तसेच कॉल करणाऱ्या व्यक्तीचा संबंध गोल्डी ब्रारच्या टोळीशी आहे का, याचाही तपास केला जात आहे. पोलिसांच्या मते, खंडणीची मागणी मान्य न झाल्यास काही गुन्हेगारी टोळ्या दहशत निर्माण करण्यासाठी हिंसक मार्गाचा अवलंब करतात. स्थानिक गुन्हेगारांच्या माध्यमातून धमकी किंवा गोळीबारासारख्या घटना घडवून टार्गेटवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात २०० कोटींच्या मागणीमागील खरा सूत्रधार कोण, महिलेला टार्गेट करण्यासाठी माहिती कोणी पुरवली आणि कॉलचा गोल्डी ब्रारशी प्रत्यक्ष संबंध आहे का, या प्रश्नांची उत्तरे तपासातून स्पष्ट होणार आहेत.