प्राध्यापकासोबत नाव जोडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये उलगडला धक्कादायक छळ (Photo Credit- X)
मृत विद्यार्थिनीचे नाव लिखिता (वय 22) असून ती मल्लाडिहल्ली येथील आयुर्वेद महाविद्यालयात ‘बीएएमएस’च्या (BAMS) अंतिम वर्षात शिकत होती. आत्महत्या करण्यापूर्वी लिखिताने एक सविस्तर सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये तिने आपल्या वर्गमैत्रिणींवर गंभीर आरोप केले आहेत. महाविद्यालयातील एका प्राध्यापकासोबत तिचे नाव जोडून मैत्रिणी तिची सतत बदनामी करत होत्या. या मानसिक त्रासाला आणि अपमानाला कंटाळूनच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे तिने पत्रात नमूद केले आहे.
लिखिताचे आई-वडील दोघेही शिक्षक असून ते होलाल्केरे येथे राहतात. आपल्या मुलीबद्दल महाविद्यालयात अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी लिखिताची समजूत काढली होती. “अशा फालतू गोष्टींकडे लक्ष न देता तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर,” असा सल्लाही त्यांनी तिला दिला होता. मात्र, मैत्रिणींकडून होणारा सततचा अपमान सहन न झाल्याने लिखिताने घरीच गळफास लावून घेतला.
या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळजनक उडाली आहे. लिखिताने सुसाईड नोटमध्ये काही मैत्रिणींची नावे स्पष्टपणे लिहिली आहेत. या माहितीच्या आधारे होलाल्केरे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी संबंधित मैत्रिणींची आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
एका गुणी विद्यार्थिनीने अशा प्रकारे जीवन संपवल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. सोशल मीडिया आणि पीअर ग्रुपमध्ये एखाद्याचे चारित्र्यहनन करणे किती जीवघेणे ठरू शकते, याचे हे दाहक उदाहरण आहे. प्रशासनाने आणि महाविद्यालयीन समितीने अशा प्रकरणांमध्ये तत्काळ हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दौंडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; पाण्याच्या कनेक्शनवरून पुन्हा वाद झाला अन् नंतर…






