
निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला घातला 32 लाखांचा गंडा; DRM अधिकारी असल्याची बतावणी केली अन् बँक माहिती घेतली
नागपूर : सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनमध्ये नियमानुसार सुधारणा करून देण्याचे आमिष दाखवत सायबर ठकबाजाने मध्य रेल्वेच्या निवृत्त कर्मचाऱ्याला तब्बल ३१ लाख ९७ हजार रुपयांचा गंडा घातला. डीआरएम कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करून ठकबाजाने विश्वास संपादन केला. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर बनावट पेन्शन कागदपत्रे पाठवून बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली आणि खात्यातील रक्कम परस्पर वळती केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विजय ढाबरे (वय ६१) हे मध्य रेल्वेतून सुमारे वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. ८ सप्टेंबर रोजी ते घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला. ‘डीआरएम कार्यालयातून धर्मेंद्र यादव बोलत आहे’, अशी ओळख सांगून त्याने ढाबरे यांच्या पेन्शनमध्ये नियमानुसार सुधारणा करण्यात येणार असल्याचे सांगितले. ठकबाजाने ढाबरे यांच्या नावाने तयार केलेली बनावट पेन्शनची कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर पाठवली. त्यामुळे फोन करणारा रेल्वे अधिकारी असल्याचा ढाबरे यांना विश्वास बसला.
Satara Crime : वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
पेन्शन सुधारण्यासाठी अर्ज भरून देण्याच्या बहाण्याने आरोपीने त्यांच्या बँक खात्याची माहिती, एटीएम कार्ड क्रमांक व सीव्हीव्ही क्रमांक मिळवला. गोपनीय माहिती हाती लागताच आरोपीने ढाबरे यांच्या खात्यातून 31 लाख 97 हजार रुपये परस्पर वळते केले. खात्यातील रक्कम कमी झाल्याचे संदेश मोबाईलवर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पेन्शनच्या नावाने सायबर सापळा
सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी पेन्शन सुधारणा, थकीत पेन्शन, महागाई भत्ता किंवा अन्य शासकीय लाभांच्या नावाने सायबर ठकबाजांकडून फोन केले जात आहेत. सरकारी अधिकारी असल्याचा विश्वास निर्माण करण्यासाठी बनावट ओळख सांगण्यासोबतच कार्यालयीन कागदपत्रांसारखे दिसणारे बनावट दस्तऐवजही व्हॉट्सअॅपवर पाठवले जातात. अशा प्रकारचा फोन आल्यास कोणतीही बँकविषयक गोपनीय माहिती देऊ नये. संबंधित विभागाच्या अधिकृत कार्यालयाशी थेट संपर्क साधून फोन करणाऱ्या व्यक्तीची खातरजमा करावी.
Crime News : HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?