सौजन्य फोटो - AI Gemini
इचलकरंजी शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. २८ ऑक्टोबर रोजी यशवंत कॉलनी परिसरातील रहिवासी अल्ताफ सद्दाम सनदी यांची दुचाकी त्यांच्या घरासमोरून लांबवली गेली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास वेगाने सुरू केला. तपासादरम्यान, शाहूपुतळा परिसरातील फळ विक्रेता प्रदीप बाळू मस्के (वय २४, रा. तारदाळ, ता. हातकणंगले) याने ही दुचाकी चोरल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संशयित मस्के याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने यशवंत कॉलनीतील दुचाकी चोरीची कबुली दिली.
तपासात समोर आलेली माहिती अधिक धक्कादायक होती. संशयित आरोपी प्रदीप मस्के हा मागील वर्षभरापासून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय होता. तो सुझुकी बर्गमॅन व होंडा ॲक्टिव्हा अशा स्वतः वापरत असलेल्या कंपनीच्या दुचाकींचीच शक्यतो चोरी करायचा. चोरी केल्यानंतर तो त्या गाड्यांना स्वतःच्या वाहनाचीच नंबर प्लेट लावून गुन्ह्याचा माग लपवण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून या चोरलेल्या दुचाकी वेगवेगळ्या व्यक्तींकडे गहाणवट ठेवून रोख रक्कम मिळवायचा. या गहाणवट ठेवलेल्या पैशांमधून तो गोव्यातील कॅसिनोमध्ये जाऊन जुगार खेळायचा आणि चैन करायचा, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात आरोपीकडून एकूण १६ मोपेड जप्त करण्यात आल्या असून, यामध्ये १२ होंडा ॲक्टिव्हा आणि ४ सुझुकी बर्गमॅन दुचाकींचा समावेश आहे. आरोपीने शिवाजीनगर हद्दीतून ७, गावभाग हद्दीतून ५, शहापूर हद्दीतून १ आणि कोल्हापुरातील शाहूपुरी हद्दीतून १ अशा १४ दुचाकी चोरल्याचे उघड झाले असून, उर्वरित २ दुचाकींबाबतचा तपास सुरू आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या माहितीनुसार, ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक शरद मेमाणे, उपनिरीक्षक प्रवीण साणे, अनिल चव्हाण व पथकाने केली. या उत्कृष्ट तपासाबद्दल पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी तपास पथकाला २० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीची आणि आपल्या चैनीसाठी अशा पद्धतीने गुन्हा करणाऱ्या या फळ विक्रेत्या चोराची सध्या कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
Ans: इचलकरंजी शहरात ही घटना घडली असून, फळ विक्रेता प्रदीप बाळू मस्के (वय २४, रा. तारदाळ) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
Ans: गोव्यातील कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी तो चोरलेल्या गाड्यांना स्वतःची नंबर प्लेट व बनावट कागदपत्रे लावून त्या इतरांकडे गहाण ठेवायचा
Ans: पोलिसांनी आरोपीकडून ४ लाख २० हजार रुपये किमतीच्या १६ चोरीच्या मोपेड (१२ होंडा ॲक्टिव्हा व ४ सुझुकी बर्गमॅन) जप्त केल्या आहेत.






