
गोदावरी चिटफंडने डॉक्टर महिलेला लावला लाखोंचा चुना (Photo Credit - AI)
नेमका प्रकरा काय?
बाजारभावापेक्षा अधिक परतावा मिळतो, गुंतवणूक पूर्णपणे जोखीममुक्त असल्याचा दावा करत विश्वास संपादन केला. ओळखीच्या व्यक्ती या भिशीचे सदस्य असल्याचे दाखले देत फिर्यादीला गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले. फिर्यादीने १० लाख रुपयांच्या भिशीत ४९ महिने तसेच २५ लाख रुपयांच्या भिशीत ३५ महिने नियमित हप्ते भरले. सर्व रक्कम बँकेमार्फत कंपनीच्या खात्यावर जमा करण्यात आली असून त्याचे पुरावे उपलब्ध असल्याचे तक्रारीत नमूद आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये १० लाखांच्या भिशीची रक्कम कमिशन वजा करून ९ लाख ५१ हजार रुपये देणे अपेक्षित असताना कंपनीकडून वेळकाढूपणा सुरू झाला. अखेर आर्थिक अडचणीचे कारण देत २५ लाखांच्या भिशीचे पुढील हप्ते थांबवण्यास सांगण्यात आले.
जीएसटी नोंदणी न करता भिशी
आरोपीनी पूर्ण पैसे दिल्याचे भासवण्यासाठी बनावट कागदपत्रे व खोट्या स्वाक्ष-यांचे कॅश व्हाऊचर तयार केल्याचा आरोप आहे. तसेच १० लाखांच्या भिशीची जीएसटी विभागाकडे नोंदणी न करता भिशी चालवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनंतर ७ लाख खात्यात केले जमा; उर्वरित रक्कम अद्याप थकित
पोलिस आयुक्ताकडे तक्रार केल्यानंतर आरोपीनी तक्रार मागे घेण्याची विनंती करत ७ लाख रुपये खात्यात जमा केले. मात्र त्यानंतरही मुद्दल व व्याज ६ लाख ४० हजार ३४९ रुपये तसेच कायदेशीर खर्च २ लाख ५० हजार रुपये न देता एकूण ८ लाख ९० हजार ३४९ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
गुंतवणूकदारांची फसवणूक
या प्रकरणात कन्नड तालुक्यातील संदिप विलास मुळे, पुरुषोत्तम सोपान तायडे यांच्यासह इतर अनेक नागरिकांचीही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपनिरीक्षक रविकिरण कदम करीत आहेत.
एक धनादेश वटला, दुसरा मात्र परत आला
सततच्या पाठपुराव्यानंतर फिर्यादीने कंपनीच्या कार्यालयात ठाण मांडले. बैठकीत केवळ ५ लाख रुपयांचा धनादेश देऊन बोळवण करण्यात आली. दोन्ही भिश्यांची भरलेली रक्कम व परतावा मिळून सुमारे २७लाख रुपये देणे बाकी असल्याचे मान्य करूनही पैसे देण्यात आले नाहीत. त्यानंतर काही महिन्यांत ४ लाख रुपये देण्यात आले. अडीच लाखांचे दोन धनादेश देण्यात आले, त्यापैकी एक वटला तर दुसरा अनादरित होऊन परत आला. आठवड्याला ५० हजार किवा महिन्याला २ लाख रुपये देण्याचे कबूल करूनही जून २०२४ मध्ये केवळ ५० हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर दिलेले सर्व धनादेश न वटल्याचे फिर्यादीत नमूद आहे.