
Hit and Run Case : नागपुरात 'हिट अँड रन'; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार
नागपूर : ‘हिट अँड रन’च्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच नागपुरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वाठोडा आणि कळमणा या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ‘हिट अँड रन’च्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. या भीषण अपघातांमध्ये तरुणासह सफाई कामगाराचा मृत्यू झाला. दोन्ही प्रकरणांतील आरोपी अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाले.
पहिली घटना, वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीस्वार तिघांना उडवले. यात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले. शुभम हरिराम तरारे (वय ३०, रा. गारगोटी, हुडकेश्वर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूपेंद्र दिनेश देव्हारे (वय ५०, रा. तुळजाईनगर, गारगोटी वस्ती, हुडकेश्वर) हे नातेवाईक शुभम आणि मित्र असे तिघे जण मोपेडने दिघोरी चौक ते उमरेड रोड मार्गे जात होते. कुल्लरकर कॉम्प्लेक्ससमोर मागून भरधाव येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या ट्रॅव्हल्स वाहनाच्या चालकाने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली.
दरम्यान, अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या शुभमला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ट्रकची सायकलला धडक
अपघाताची दुसरी घटना, कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. लवनेश गुलाबचंद जनवारे (वय ३०, रा. कळमणा मार्केटजवळ) हा सफाई कामगार आहे. सायकलने साफसफाईच्या कामासाठी जात होता. यावेळी पारडी भरधाव उड्डाणपुलाजवळ आलेल्या अज्ञात ट्रकने त्याला धडक दिली. अपघातानंतर चालक ट्रकसह फरार झाला.
उपचारापूर्वीच एकाचा मृत्यू
परिसरातील नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेत लवनेशला मेयो रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दोन्ही घटनांतील फरार वाहनचालकांचा शोध सुरू आहे.
BLO कामावरून परतणाऱ्या शिक्षकाचा जागीच मृत्यू
धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे पेट्रोल पंपासमोर झालेल्या भीषण अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. BLO चे शासकीय काम पूर्ण करून परतत असताना चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत कनगरा (ता. धाराशिव) येथील रहिवासी तथा बेंबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक गोविंद इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.