Hydroponic-Marijuana : अहमदाबाद विमानतळावर 8.9 किलो गांजा जप्त, मुंबईतील नागरिकाला अटक, सौजन्य : आयएएनएस
सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी सोमवारी बँकॉकवरून आलेल्या मुंबईतील एका व्यक्तीकडून 8.913 किलोग्रामचे हायड्रोपोनिक गांजा (Hydroponic-Marijuana) जप्त केले आहे. हा गांजा त्या व्यक्तीने आपल्या बॅगेतील सामानात लपवून ठेवला होता.
अहमदाबाद कस्टम्सच्या एअर इंटेलिजेंस यूनिटने बँकॉकवरून थाई एअरवेजची फ्लाइट टीजी-343 वरून येणाऱ्या प्रवाशांच्या प्रोफायलिंगनंतर एका पुरुष प्रवाशाला थांबवले. त्याच्या चेक इन सामानाची झाडाझडती घेतली असता अधिकाऱ्यांना त्यात 14 एअरटाइट प्लास्टिक पॅकेट आढळले, ज्यात त्यांना हिरव्या रंगाचा पदार्थ आढळला. त्याने हे सर्व पॅकेट आपल्या कपड्यांच्या आत लपवून ठेवले होते.
सुरुवातीला एनडीपीएस फील्ड टेस्टिंग किटच्या वापराने करण्यात आलेल्या प्राथमिक तपासात तो हिरवा पदार्थ हा गांजा असल्याचे सिद्ध झाले. जप्त करण्यात आलेल्या पदार्थाचे एकूण वजन 8,913 ग्राम म्हणजेच एकूण 8.9 किलोग्राम आढळले.
अंमली पदार्थ आणि मनोविकारी पदार्थ अधिनियम, 1985 (एनडीपीएस) अंतर्गत हा गांजा जप्त करण्यात आला आणि त्या प्रवाशाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अशावेळी करण्यात आली, जेव्हा दक्षिण-पूर्व आशियातून अहदाबादेत गांजाच्या तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे.
जूनमध्ये कस्टम्स अधिकाऱ्यांना बँकॉकवरून आलेल्या एका २० वर्षीय प्रवाशाकडे 10.911 किलोग्राम हायड्रोपोनिक गांजा आढळला होता. त्याने आपल्या ट्रॉली बॅगेत पाच पाकिटे लपवली होती. त्या प्रवाशी तरुणालाही अटक करण्यात आली आहे.
त्याचप्रकारे मे महिन्यात इतर एका प्रवाशावर अशाचप्रकारे कारवाई करण्यात आली होती. त्याच्याकडून 6.54 किलोग्राम गांजा जप्त करण्यात कस्टम्स अधिकाऱ्यांना यश आले होते. यातील अनेक प्रवाशी मुंबई मार्गे अहमदाबाद विमानतळावर प्रवास करत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले, त्याअनुषंगाने पोलिसांनी आपल्या तपास मोहिमेला वेग दिला आहे.






