संग्रहित फोटो
पुणे/अक्षय फाटक : वैभवशाली गणेशोत्सावाने पुण्यनगरीचे वातावरणात भक्तीमय झालेलं आहे. “जय गणेशा”च्या गजराने पुण्यनगरी उजळली जात असताना मात्र, दुसरीकडे शहर “कोयत्याच्या टोकावर थरथरत” आहे. गेल्या काही महिन्यांत घडत असलेल्या कोयत्याचे हल्ले, तोडफोडीचे सत्र अन् रक्तांच्या धारांच्या खेळाने पुणेकरांत दहशतीचे काळे सावट पसरलेले आहे. दोन गटातील वाद आणि त्यामुळे होणारे हल्ले, रस्त्यातील टोळीबाजी आणि किरकोळ वादातून वाहणारे रक्त या सगळ्याने “सुरक्षित पुणे”च्या प्रतिमेला जबर धक्का बसला जात आहे. काही केल्याने घटना पोलिसांना थांबवता येत नसल्याने आता सर्व सामान्य पुणेकर “लाडक्या बप्पा”लाच पुण्यनगरीतला गुन्हेगारीचा खेळ थांबव, अशी आर्त हाक मारू लागले आहे. गेल्या ७ महिन्यात ३३६ कोयत्याने हल्ले व गोळीबाराच्या १० घटना घडल्या आहेत.
पुण्यनगरीची शांतता भंग पावत आहे. मग, टोळी युद्ध असो वा नव्याने प्रत्येक भागात तयार झालेले नवीन भाई असो. अल्पवयीन मुलांच्या टोळक्यांनी तर मोठा कहर माजवला आहे. पोलिसांनी ‘परिवर्तन’च्या माध्यमातून या मुलांना बाहेर काढण्याचा ‘पण’ केला असला तरी ही मुलं सातत्याने गुन्हेगारी कृत्य करत आहेत. किरकोळ वाद, रस्त्यातील वर्चस्व आणि टोळीबाजी यावरून एकमेकांवर हल्ल्यांची मालिका सुरूच आहेत. निरपराध नागरिक मात्र, यात दहशतीच्या छायेखाली जगत असल्याचे वास्तव आहे. रात्रीअपरात्री कोयते हातात घेऊन फिरणाऱ्या मुलांनी तर पुणे पोलिसांची अन् पुणेकरांची दमछाक केली आहे. हुल्लडबाजी करत नशेत एखाद्या भागात घुसायचे अन् तिथे नंगा नाच करून दहशतीचा माहोल निर्माण करायचा नित्यनियम सुरू आहे. कोंढव्यात तरुणांनी असाच राडा घातला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरून ही मुल कशा पद्धतीने दहशत माजवतात, हे लक्षात येत. अंगावर शहारे उभे रहावे अशी स्थिती त्यावेळी निर्माण झालेली असते. डोळ्यां देखत वाहनांची तोडफोड होताना नागरिक फक्त पाहू शकतात. ते बाहेर येण्याची हिंम्मतही करत नाही. त्यातूनच मग, कोयत्याने हल्ले करून रक्तपाताचा खेळ सुरू आहे. धक्कादायक म्हणजे, या घटना वाढल्याचे चित्र यंदा तरी दिसत आहे.
आपसूकच यामुळे सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या प्रतिमेला अशा घटनांनी तडा गेला आहे. त्यामुळे “कोयत्याचा धाक संपणार कधी ?” हा प्रश्न आहे. त्यामुळे पुणेकरांचा आक्रोश आता “बप्पा, समोर मांडू लागले असून, त्यांनी बप्पालाच आम्हाला या दहशतीतून तार..!” अशी विनवणी सुरू केली आहे.
पोलिसांनी काय केले?
पोलिसांनी अशा घटनांसाठी रात्रीची गस्त, हॉटस्पॉट भागांवर नाकाबंदी, सीसीटीव्हीद्वारे संशयितांची ओळख, कोयत्यांची जप्ती आणि शेकडो गुन्हेगारांना गजाआड पाठविण्याची कारवाई केली आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर मोक्काअंतर्गत कठोर कारवाई केली जात आहे. तरीसुद्धा, रक्तपाताचे थरारक प्रकार सुरूच असल्याने नागरिक अस्वस्थ आहेत.
गेल्या दीड वर्षांत पुणे पोलिसांनी विशेष मोहिमेतून ७५० पेक्षा जास्त कोयते व धारदार शस्त्रं जप्त केली आहेत. आतापर्यंत २५० हून अधिक आरोपींवर मोक्का कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन कोयता’ अंतर्गत गस्त, नाकाबंदी, सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू आहे.