वर्षाच्या बाराही महिने आहारात दह्याचे सेवन केले जाते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दही, ताक किंवा इतर थंड पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. दुपारच्या जेवणात नियमित वाटीभर दही खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पण कायमच साखर किंवा मीठ टाकून दही खाण्याचा कंटाळा आल्यानंतर तुम्ही घरात हे पदार्थ बनवून खाऊ शकता. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी आणि स्वच्छ ठेवतात. याशिवाय दह्यातील चांगले बॅक्टेरिया आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.(फोटो सौजन्य – istock)
पचनशक्ती कायमच निरोगी राहण्यासाठी दह्यापासून बनवलेल्या 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बुंदी रायता किंवा दह्याचा रायता बनवून खाल्ला जातो. या पदार्थाच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे तुम्ही काकडी, कांदा किंवा बुंदी घालून रायता बनवू शकता.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडणारा पदार्थ म्हणजे दह्याची कढी. अनेक घरांमध्ये दह्याच्या कढीसोबत कांद्याची किंवा डाळीची भाजी बनवली जाते. जेवणात कढी असेल तर चार घास जास्त जातात.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात थंडावा वाढवण्यासाठी लस्सी प्यायली जाते. गोड लस्सीचे सेवन केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही.
दक्षिण भारतात दही भात हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर तुम्ही दही भात बनवू शकता. हिरव्या मिरचीची फोडणी देऊन बनवलेला भात चवीला अतिशय सुंदर लागतो.
दह्यामध्ये स्ट्रॉबेरी, केळी किंवा आंबा यांसारखी अनेक वेगवेगळी फळे टाकून तुम्ही खाऊ शकता. सकाळच्या नाश्त्यात दही आणि फळे खाणे आरोग्यासाठी पौष्टिक ठरेल.