आमदारांवर आरोप अन् अपहरणाचा....; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड
पुणे : बीडमधील विद्यमान आणि राज्यभरात भाषण शैलीने प्रसिद्धीस आलेल्या एका आमदारावर आरोप करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या तरुणाच्या अपहरण नाट्याने पुणे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पण, तरुणाने एका गहुंजी भागातील लॉजमध्ये मुक्काम ठोकल्याचे तपासातून समोर आले आहे. त्याला सुखरूप पाहिल्यानंतर पोलिसांची धावपळ थांबली अन् पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास देखील सोडला. परंतु, या बनावट अपहरणामुळे मात्र, यंत्रणेची दमछाक झाली. गेल्या महिन्यातील हा बनावट अपहरणाचा दुसरा प्रकार आहे.
संबंधित तरूण मूळचा बीडचा आहे. तो पुण्यात स्थायिक झाला असून, त्याने बीडमध्ये नुकतीच पत्रकार परिषद घेत त्याने सत्ताधारी पक्षाच्या एका स्थानिक आमदारावर आरोप केले. तसेच, मुख्यमंत्र्यांनी संबंधित आमदाराचा राजीनामा घेऊन कायदेशीर कारवाई करावी अन्यथा २६ मार्चला आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, २५ मार्चला सकाळी दहा वाजता या तरुणाने त्याच्या पत्नीला फोन केला आणि ‘काही लोक मला घेऊन चालले आहेत’ अशी बतावणी केली. नंतर तरुणाचा मोबाइल बंद झाला. पत्नीने वारजे माळवाडी पोलिसांकडे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला.
लागलीच वारजे पोलीस व गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषणात तरुणाचे शेवटचे ‘लोकेशन’ दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास गहुंजे येथील होते. त्यानुसार पथकांनी गहुंजे गाठले. तांत्रिक विश्लेषण करीत शोध सुरू केला. बऱ्याच वेळानंतर म्हणजे, मध्यरात्री तरूण शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॉजमध्ये सापडला. तेथून तरुणाला ताब्यात घेऊन वारजे माळवाडी पोलिसांत आणले. तरुणाने अपहरणाचा बनाव रचला होता, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी दिली. प्रकरण स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. पण, काही काळ पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती.
महिन्यातील तिसरे प्रकरण
अपहरणनाट्याची महिन्याभरातील ही तिसरी घटना आहे. बिबवेवाडीतून एका व्यापाऱ्याने अशाच प्रकारे दोन कोटींसाठी अपहरणनाट्य रचले होते. पण, तोही मुंबईतील एका लॉजमध्ये आढळून आला होता. नंतर आता या तरुणाचे अपहरणनाट्य समोर आले आहे. बनावट अपहरणामुळे पोलिसांची विनाकारण तारांबळ उडत आहे. तर, एका सहाय्यक वकिलाने देखील आपले अपहरण करून दिवे घाटात नेऊन मारहाण झाल्याचा बनाव रचला होता. तो दारूच्या नशेत पडल्याचे तपासात समोर आले होते.