Pune Crime : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; व्यावसायिकाचे घर फोडून लाखोंचा ऐवज चोरला
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कुंभमेळ्यासाठी कुटुंबीयांसह प्रयागराजला गेलेल्या व्यावसायिकाच घर फोडून चोरट्यांनी आठ लाख रुपयांचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार बिबवेवाडी परिसरात घडला आहे. याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला, तिचे पती बिबवेवाडीतील सुखसागरनगर भागात असलेल्या ओशिया काॅर्नर सोसायटीत राहायला आहेत. महिलेचे पती व्यावसायिक आहेत. माहितीनुसार, १२ फेब्रुवारी रोजी महिला, पती व त्यांचे मुलं असे पूर्ण कुटुंब कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला गेले होते. महिलेला १५ वर्षीय मुलगी आहे. ती एका शाळेत शिक्षण घेत आहे. परीक्षा तोंडावर आल्याने महिलेने मुलीला मामाकडे ठेवले होते. मुलीचे मामा गोकुळनगर भागात राहायला आहेत. प्रयागराजला जाताना महिलेने मुलीकडे सदनिकेची चावी दिली होती.
१३ फेब्रुवारी रोजी मुलगी शाळेतून मामाकडे गेली. मात्र, शालेय साहित्य सुखसागरनगर भागातील घरी ठेवण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर मुलगी सायंकाळी सहाच्या सुमारास घरी गेली. तेव्हा तिला घराचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. मुलीने या घटनेची माहिती मामाला दिली. १५ फेब्रुवारी रोजी मुलीचे आई-वडील प्रयागराजहून पुण्यात परतले. त्यांनी पाहणी केली. तसेच नेमका किती ऐवज चोरीला गेला, याची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, उपनिरीक्षक शशांक जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासासाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करत आहेत.
रविवार पेठेतील वस्त्रदालनात चोरी
रविवार पेठेतील कापडगंज परिसरात मोठे कापड दुकान आहे. हे दुकान देखील चोरट्यांनी फोडून १ लाख ६८ हजारांची रोकड आणि लॅपटॉप असा १ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला आहे. याबाबत गोविंद राजाराम मुंदडा (वय ६५, रा. गंगाधाम, मार्केट यार्ड) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मुंदडा यांचे कापडगंज परिसरात साडी विक्रीचे दुकान आहे. दुकान बंद असताना चोरट्यांनी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्यातील रोकड आणि लॅपटॉप चोरुन पोबारा केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिवराज हाळे करत आहेत.