
Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनेच्या दिवशी धर्मा पवार याने ८०० रुपयांचे रुद्राक्ष विकले होते. त्यानंतर सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास दोघे भडगाव स्टेशन परिसरात दारू पिण्यासाठी बसले. रुद्राक्ष विक्रीतून मिळालेल्या 800 रुपयांच्या वाटपावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर जुगा पवार याने जवळ पडलेला दगड उचलून धर्माच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात धर्मा याचा मृत्यू झाला.
हत्येनंतर आरोपी जवळच्या शेतात जाऊन बसला होता. परिसरात कुत्रे भुंकत असल्याने पोलिसांनी त्या दिशेने शोध घेतला असता आरोपी आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या बॅगेची झडती घेतली. पोलिसांच्या माहितीनुसार, बॅगेत मृत तरुणाचे तोडलेले दात आढळले. तसेच बॅगेत दोन जिवंत कबुतरेही आढळल्याची माहिती आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील घुमावल गावात आणखी एक दुर्दैवी घटना घडली. गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांनी विरोध केल्याने 12 वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. हा मुलगा सहावीच्या वर्गात शिकत होता. घराच्या तिसऱ्या मजल्यावर ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी चोपडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.