
Crime News: ३५ लाखांची सुपारी, तिहेरी हत्याकांडाचा कट; जळगाव पोलिसांनी पाच शार्प शूटर्सना पकडले
जळगाव : भुसावळ शहरात संभाव्य तिहेरी हत्याकांड आणि गँगवार घडवून आणण्याचा कट जळगाव पोलिसांनी उधळून लावला आहे. मिथुन बारसे, क्रिश बारसे आणि करण यांची हत्या करण्यासाठी तब्बल ३५ लाख रुपयांची सुपारी घेणाऱ्या पाच संशयित शार्प शूटर्सना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर मृतांच्या अंगावरील सोने लुटण्याचाही कट आखण्यात आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, बंटी पथरोड आणि शिव पथरोड यांनी या हत्यांसाठी सुपारी दिल्याचा आरोप आहे. यापैकी पाच लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
११ ऑक्टोबरच्या मध्यरात्री जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात मिथुन बारसे आणि क्रिश बारसे यांची हत्या करून त्यांच्या अंगावरील सोने लुटण्याचा आंतरजिल्हा टोळीचा कट होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या कटाची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी पिंप्राळा परिसरात सापळा रचला. इनोव्हा कारमधून जात असलेल्या पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे खुशाल गजानन बोरसे, संदीप बबन लोंढे, राजू उर्फ ओमकार भदरगे, अरविंद विजय कांबळे आणि सोनू महेंद्र जयस्वाल अशी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण चार गावठी कट्टे, नऊ काडतुसे, धारदार शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. तसेच उमाळा येथील भाड्याच्या खोलीतून दोन गावठी पिस्तूल, दोन काडतुसे आणि ६२ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. या प्रकरणात बंटी पथरोड, शिव पथरोड, अभिषेक गोयर आणि रवी होळकर यांनाही आरोपी करण्यात आले आहे. हत्येचा कट नेमका कसा आखण्यात आला, सुपारीची रक्कम कोणाकडून आणि कोणामार्फत देण्यात आली, तसेच या टोळीचे आणखी कोणाशी संबंध आहेत, याचा पोलिस तपास सुरू आहे.