
पोलिसांनी केला कौशल्यपूर्ण तपास
पोलिसांनी जप्त केला ३४ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल
जप्त करण्यात आली गाडी व देशी बनावटीची पिस्तूल
कराड: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर नांदलापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत होलसेल व्यापाऱ्याचे अपहरण करून तब्बल पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या गंभीर गुन्ह्याचा (Crime) कराड तालुका पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासातून पर्दाफाश केला. याप्रकरणी पाच संशयित आरोपींना अटक करून ३४ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेली गाडी व देशी बनावटीची पिस्तूल जप्त केली आहे, अशी माहिती पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली दिली.
शुभम महेश कदम (वय २९, रा. मलकापूर, ता. कराड), श्रीहरी धनाजी साळुंखे (वय २५, रा. बैलबझार रोड, गणपती मंदिराजवळ मलकापूर, ता. कराड), वरूण विकास मोहिते (वय २८, रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड), राहुल दिपक खडंग (वय २६, रा. उंब्रज, ता. कराड) व फिर्यादीचा कारचालक नवनाथ बाळासो चोरमुले (वय ३१, रा. जयसिंगपूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत.
हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, स.पो.नि. सखाराम बिराजदार, पो.उ.नि. धनंजय पाटील यांच्यासह नितीन येळवे, धनंजय कोळी, संजय जाधव, सचिन निकम, किरण बामणे, सागर बर्गे, प्रफुल्ल गाडे व मयूर देशमुख यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
Crime News: ‘डिजिटल अरेस्ट’ करून गृहिणीला २५ लाखांचा गंडा; मुंबई पोलीस आणि ईडी अधिकारी असल्याचा बनाव
कराड पोलिसात गुन्हा दाखल
दि. १८ डिसेंबर रोजी जयसिंगपूर (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील पेपर विक्री व्यवसाय करणाऱ्या होलसेल व्यापाऱ्याच्या वाहनास अज्ञात व्यक्तींनी धडक देऊन त्यांची गाडी अडवली. व्यापारी व त्यांचा चालक नवनाथ चोरमुले यांना जबरदस्तीने गाडीत बसवून अज्ञात ठिकाणी फिरवण्यात आले. लाकडी दांडके व चाकूचा धाक दाखवून मारहाण करत व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले व त्यांच्याकडून पाच कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. यावेळी संशयितांनी व्यापाऱ्याजवळील ३३ लाख ३५ हजार ७०० रुपये रोख रक्कम व सुमारे दोन तोळे वजनाची, दोन लाख रुपये किमतीची सोन्याची चैन असा एकूण ३५ लाख ३५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लंपास केला होता. या घटनेबाबत कराड तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला होता.
पथकाचा कौशल्यपूर्ण तपास
गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक तुषार दोषी व अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी तत्काळ तपासाबाबत सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील यांनी पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथके तयार केली होती. तपासादरम्यान फिर्यादी व चालक चोरमुले यांच्याकडून मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार व पोलिस उपनिरीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत पाच संशयित आरोपी निष्पन्न केले. त्यांच्याकडून ३४ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेली गाडी व देशी बनावटीची पिस्टल जप्त करण्यात आली.