संग्रहित फोटो
पुणे : पुणे राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, मारामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीही गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही. अशातच आता पुणे गु्न्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. कात्रजमधील आंबेगाव परिसरातून बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि काडतूस जप्त केले आहे.
शुभम राजेंद्र बेलदरे (वय २९, रा. दत्तनगर, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव), मयूर ज्ञानोबा मोहोळ (वय २३, रा. नऱ्हे रस्ता, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी मयूर भोकरे आणि रहीम शेख हे कात्रज भागात गस्त घालत होते. त्या वेळी दोघे जण थांबले असून, त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती भोकरे आणि शेख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त केले. दोघांनी पिस्तूल का बाळगले, तसेच त्यांनी कोणाकडून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, रणजीत फडतरे, रहीम शेख, मयूर भोकरे, विजय कांबळे, नितीन बोराटे, नितीन कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार यांनी ही कामगिरी केली.
टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला
पुण्यातील लोहगाव भागातून एक घटना समोर आली आहे लोहगाव भागात वैमनस्यातून टोळक्याने एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भाऊसाहेब गोपीनाथ राखपसरे (वय ४८, रा. मोझे आळी, लोहगाव) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खुनाचा प्र्रयत्न केल्याप्रकरणी नितीन सकट, निकेश पाटील, गणेश सखाराम राखपसरे, ओंकार उर्फ खंड्या खांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.