संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देश आणि विदेशात फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. सायबर चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. सायबर चोरीच्या घटना थांबताना दिसत नाहीत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक असलेल्या पुणेकराला सायबर चोरट्यांनी ४५ लाखांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘त्याच्या नावाने भारतात आधार आणि सिमकार्ड वापरून बँक खाते उघडले. या खात्यांद्वारे अवैध आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात त्याच्यावर ‘डिपोर्टेशन ऑर्डर’ असल्याचे सांगून त्याला धमकावून बँक खात्यांची पडताळणीचा बहाणा करून ४५ लाख रुपये स्वत:कडे ट्रान्सफर करून घेतले आहेत. याप्रकरणी संबंधित व्यक्तीच्या ७० वर्षीय वडिलांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी भारतातून अमेरिकेत स्थायिक व्यक्तीला फोन केला. स्वत:ला भारतीय दुतावास, वॉशिंग्टन व मुंबई सायबर क्राइमचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्याला सांगितले की त्याच्या नावाने भारतात आधार व सिमकार्ड वापरून बँक खाते उघडले असून, या खात्यांद्वारे अवैध आर्थिक व्यवहार झाले आहे. “तुझे बँक खाते, लॅपटॉप, पत्नीचा फोन टॅप केला आहे. चौकशीबद्दल कोणाशी बोलू नकोस. अन्यथा तुला अमेरिकेतून डिपोर्ट केले जाईल,’ असा दबाव टाकला.
अमेरिकेतील वेळेनुसार रात्री उशिरा (भारतीय वेळ सकाळी) तक्रारदाराच्या मुलाला फोन करून त्याच्या ॲक्सिस बँकेच्या खात्यातील ४५ लाख रुपये आरटीजीएसद्वारे अन्य खात्यावर ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. मात्र, हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे समोर आल्यानंतर तक्रारदाराने ऑनलाइन तक्रार केली. ती कोरेगाव पार्क पोलिसांकडे वर्ग झाली. त्यानुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक सुनिल थोपटे करत आहेत.
सोशल मीडियावरील ओळख महिलेला पडली महागात
सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणाने सीबीआय अधिकारी असल्याची बनावट ओळख सांगत महिलेचा विश्वास संपादन करून तिची चार लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने महिलेला लग्नाचे आमिषही दाखविले होते. वानवडीतील फातिमानगर येथील ४२ वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यावरू वानवडी पोलिसांत शिरीष जयंतीलाल गोहेल उर्फ चिराग मित्तल (वय २७, रा. ससाणेनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १८ जुलै २०२४ ते २३ जुलै २०२५ या कालावधीत घडली आहे.