सौजन्य फोटो - नवराष्ट्र टीम
दहीहंडीच्या गर्दीत प्रकार
नेतवड येथे सकाळी सुमारे ११ वाजता दहीहंडीचा कार्यक्रम सुरू असताना दीड वर्षांचा मुलगा खेळत होता. त्यावेळी एक अनोळखी महिला मुलाजवळ आली. ती मुलाला घेऊन जात असल्याचे आजीच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ मुलाला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधित महिला लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून जुन्नरच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांची तातडीने दोन पथके
घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी दोन पथके तयार केली. पोलिसांनी ओतूर, जुन्नर तसेच परिसरातील मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.
महिलेची ओळख पटली
पोलिसांनी ४० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून लाल रंगाच्या स्विफ्ट कारचा माग काढला. अखेर हे वाहन जुन्नर येथे आढळून आले. त्यानंतर वाहनातून गेलेल्या महिलेची ओळख पटवण्यात आली. सदर महिला आरीफा मुराद व्यापारी (वय ५२, रा. जुन्नर) असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता ती उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. तसेच ती कोणालाही न सांगता घराबाहेर पडल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
टोळी असल्याचे पुरावे नाहीत
तपासात संबंधित महिला सकाळी नेतवड येथे आली होती. तेथे नातेवाईकांची भेट झाल्यानंतर त्यांनी तिला लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून जुन्नर येथे परत नेल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, घटनेनंतर सोशल मीडियावर ‘मुलं पळवणारी टोळी’ असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात अशा कोणत्याही टोळीचे अस्तित्व आढळून आलेले नाही.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
नागरिकांनी सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. संशयास्पद व्यक्ती किंवा घटना आढळल्यास स्वतः कायदा हातात न घेता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये लहान मुलांवर सातत्याने लक्ष ठेवावे, त्यांना घरात, वाहनात किंवा सार्वजनिक ठिकाणी एकटे सोडू नये, तसेच घर, दुकान आणि परिसराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवावेत, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी केले.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक संदिप आमणे, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, दिनेश साबळे, पोलीस कर्मचारी ज्योतीराम पवार, अमोल शिंदे, राजेंद्र आमले, आशिष जगताप आणि महिला पोलीस कर्मचारी आकांक्षा साबळे सहभागी होते.






