
कोल्हापुरात खळबळ! गोड बोलून कड्यावर नेलं, काही तासांत रचला बेपत्ता होण्याचा बनाव; चौकशीत प्रियकराचं भयंकर सत्य उघड
कोल्हापूर : महाराष्ट्रात केतन अग्रवाल हत्याकांडाची चर्चा सुरू असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातून त्याच पद्धतीची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न ठरल्यामुळे यापुढे प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने आपल्या प्रेयसीला तब्बल अडीचशे फूट खोल दरीत ढकलून तिची हत्या केल्याचा प्रकार भुदरगड तालुक्यातील नाईकवाडी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयित प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरन्नूम बशीर नाईक (वय २३, मूळ रा. पाटगाव, सध्या रा. गारगोटी) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर श्रीपाद दिनकर वडर (वय २५, रा. अवधूत कॉलनी, गारगोटी) असे संशयित प्रियकराचे नाव आहे. या घटनेमुळे गारगोटीसह संपूर्ण भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीपाद आणि तरन्नूम हे गारगोटी येथे एकमेकांच्या घरासमोर राहत होते. त्यांची जुनी ओळख होती. या ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या साडेपाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. तरन्नूम इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. काही महिन्यांपूर्वी तरन्नूमचा विवाह ठरला. त्यामुळे तिने श्रीपादला भेटणे टाळण्यास सुरुवात केली. यापुढे आपले प्रेमसंबंध सुरू ठेवता येणार नाहीत, अशी भूमिका तिने घेतली होती.
शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सकाळी सुमारे अकराच्या सुमारास श्रीपादने गोड बोलून तरन्नूमला नाईकवाडी येथील कड्यावर फिरण्यासाठी नेले. तेथे तरन्नूमने आपले लग्न ठरल्याने आता यापुढे प्रेमसंबंध ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यावरून संतापलेल्या श्रीपादने दुपारी सुमारे तीनच्या सुमारास तरन्नूमला अडीचशे फूट खोल दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने स्वतः भुदरगड पोलिस ठाण्यात धाव घेतली.
तरन्नूम बेपत्ता झाल्याचा बनाव श्रीपादने रचल्याचे तपासात समोर आले. पाणी आणण्यासाठी दुचाकीवरून गेलो असता तरन्नूम बेपत्ता झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांना श्रीपादच्या कथनावर संशय आला. कसून चौकशी सुरू केल्यानंतर त्याच्या जबाबातील विसंगती समोर आल्या. पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर अखेर त्याने तरन्नूमला दरीत ढकलल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शुक्रवारी रात्री उशीर झाल्याने आणि अंधार पडल्यामुळे दरीत शोधमोहीम थांबवावी लागली. शनिवारी सकाळी आंबोली येथील बचाव पथकाने पुन्हा शोधमोहीम सुरू केली. सुमारे चार तास अथक प्रयत्न केल्यानंतर दोरीच्या साहाय्याने अडीचशे फूट खोल दरीतून तरन्नूमचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पुण्यातील लोहगडावर केतन अग्रवाल याची हत्या केल्याच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच कोल्हापुरातही प्रियकराने प्रेयसीची दरीत ढकलून हत्या केल्याचा प्रकार समोर आल्याने या घटनेने राज्याचे लक्ष वेधले आहे.