कोपरखैरणेत घरात घुसून पावणे बारा लाखांची चोरी; लक्ष्मी हार, ब्रेसलेट, नेकलेस अन् मंगळसूत्र चोरीला (फोटो सौजन्य-X)
सावन वैश्य, नवी मुंबई: कोपरखैरणे सेक्टर सहा मधील एका उघड्या दरवाज्याद्वारे अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून, घरातील कपाटात असलेले जवळपास पावणे बारा लाखांच्या दागिन्यांची चोरी केली आहे. आपल्या सुरक्षेसोबत आपल्या ऐवजाची जबाबदारी खरंतर आपली असते. पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बेकायदेशीर कृती करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करतात. आपल्याला मौल्यवान ऐवजाची काळजी घेण्याचं, तसेच मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित स्थळी ठेवण्याचा आवाहन पोलिसांकडून केल जात.
मात्र काही बेजबाबदार नागरिक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. मग एखादी अप्रिय घटना घडली की मग पश्चाताप करावा लागतो. अशाच प्रकारच्या पश्चातापाची वेळ कोपरखैरणेतील एका महिलेवर आली आहे. फिर्यादी महिलेच्या घरातील कपाटात मौल्यवान सोन्याचे दागिने असताना देखील, सदर महिलेने घराचा दरवाजा उघडा ठेवला. तसेच त्यातल्या त्यात दागिने असलेल्या कपाटाला चावी तशीच ठेवली. त्यामुळे चोरट्याला ‘सोने पे सुहागा’ अशी संधी मिळाली.
याच संधीचा फायदा घेत आज्ञा चोरट्याने उघड्या दरवाजातून घरात प्रवेश केला आणि कपाटातला आधीच असलेल्या चावीने दरवाजा अलगद उघडून, कपाटातून दोन सोन्याचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या चैन, एक सोन्याचा नेकलेस, एक सोन्याचा लक्ष्मी हार, एक सोन्याच ब्रेसलेट, तीन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे पेंडंट, सोन्याची वेल, सोन्याची नथ, असा एकूण 11 लाख 84 हजार रुपयांचा ऐवज लंपस केला. याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीननाथ वरुडे करत आहेत.
तर याआधी कोपरखैरणे येथील सेक्टर १९ येथील एका सलूनमध्ये काम करणाऱ्या समीर अहमद (२३) याच्यावर सात जणांनी काठ्या आणि कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात त्याला गंभीर दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, समीर ज्या सलूनमध्ये काम करत होता त्याच सलूनमध्ये एक महिलाही काम करत होती. समीर तिच्याशी वारंवार व्हॉट्सअॅपवर चॅट करत असे. यामुळे तिचा प्रियकर अरबाज रागावला आणि सुरुवातीला तो फोन करून तिच्याशी गैरवर्तन करत असे. त्यावेळी परिस्थिती निवळली होती. मंगळवारी आरोपीने फोन करून सांगितले की मुलीच्या आईने त्याला घरी बोलावले आहे. समीरने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर, रात्री १० वाजताच्या सुमारास, आरोपी इतर मित्रांसह सलूनमध्ये आला आणि त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. या घटनेनंतर जखमी समीरने बुधवारी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात अरबाज आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध तक्रार दाखल केली.