सौजन्य फोटो - सोशल मिडीया
लोणावळा: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील भुशी गावात रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अभय माणिक मराठे (वय ३३) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे भुशी गावासह लोणावळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, भुशी गावातील प्रसिद्ध ‘हॉटेल मोतीराम’च्या आवारात ही घटना घडली. अभय मराठे हे त्यांच्या वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करत होते. रायफल साफ करत असताना अचानक ट्रिगर दाबला गेल्याने त्यातून गोळी सुटली. ही गोळी थेट अभय यांच्या छातीत लागली. गोळीचा आवाज होताच कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
गोळी लागल्याने अभय गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी त्यांना तातडीने लोणावळ्यातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, गोळी छातीत खोलवर लागल्याने डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी रुग्णालयात तसेच घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परवानाधारक शस्त्र असतानाही रायफल साफ करताना आवश्यक सुरक्षा खबरदारी घेतली होती का, तसेच रायफलमध्ये गोळी लोड का होती, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. हा प्रकार केवळ अपघात आहे की यामागे अन्य काही कारण आहे, या सर्व शक्यतांच्या अनुषंगाने लोणावळा शहर पोलीस तपास करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मराठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.






