
Baramati Chain Snatching, Baramati Crime News,
याप्रकरणी नमिता निर्मलकुमार गांधी (वय ६२, रा. मोरया नगर, भिगवण रोड, बारामती) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Crime News: दोन इंजेक्शन्स दिली अन् काही वेळातच चिमुकलीच्या नाक-तोंडातून रक्त; वसईत धक्कादायक घटना
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण रोडवरील हॉटेल लिफ्टजवळ गांधी यांचे निवासस्थान असून, याच इमारतीच्या तळमजल्यावर त्यांचे किराणा दुकान आहे. घटनेच्या वेळी नमिता गांधी या दुकानात एकट्याच होत्या. त्यांचे पती निर्मलकुमार गांधी हे कामानिमित्त भवानीनगर येथे गेले होते.
सोमवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास दुचाकीवरून आलेले दोन तरुण दुकानात शिरले. त्यापैकी एकाने हेल्मेट घातले होते, तर दुसऱ्याने तोंडाला रुमाल बांधला होता. दुकानात आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला सिगारेटची मागणी केली. याच दरम्यान, त्यांच्यापैकी एकाने नमिता गांधी यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण अचानक हिसकावले. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा ओमासे आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
बारामती तालुक्यात अलीकडच्या काळात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी शेरेवाडी परिसरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या हल्लेखोरांनी दोन वृद्ध महिलांची हत्या केल्याची घटना समोर आली होती. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असतानाच, दुसऱ्याच दिवशी शहरात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावण्याचा प्रकार घडला. त्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत असून, चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.