१५० कोटींहून अधिक माती भराव प्रकरण, २८ आरएमसी प्लांटवर गुन्हे दाखल (फोटो सौजन्य-X)
वसई, रवींद्र माने : वसईमधील १५० हून अधिक कोटींचा माती भराव केल्याप्रकरणी नायगाव पुर्वेकडील २८ आरएमसी प्लांट विरोधात महसुल विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. ससूनवघर आणि मालजीपाडा परिसरात गेले काही वर्षे उभे राहिलेले अनधिकृत आरएमसी आणि डांबर प्लांट पर्यावरणाला घातक ठरले आहेत. वारंवार तक्रारी करुनही त्यांच्यावर कारवाई केली जात नव्हती.अखेर ससूनवघरचे ग्राममहसूल अधिकारी सुशील मोराळे यांनी कारवाई करत तब्बल २८ आरएमसी प्लांट धारकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
तसेच मोराळे यांनी अनधिकृत माती भराव प्रकरणी काही सातबारांवर १५० कोटींहून अधिक दंडात्मक बोजा चढवला आहे.जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखर आणि तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.मंडळ अधिकारी अरुण मुर्तडक यांनीही या कारवाईत सहभाग घेतला होता.वसईतील महसूल विभागातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
गेल्या महिन्यात ससूनवघर परिसरातील महाकाल आरएमसी प्लांटमधील विहिरीत पडून दोन मजुरांचा मृत्यू झाला होता.त्यामुळे पर्यावरण प्रेमीं आणि येथील नागरिकांनी या प्लांट्सवर कारवाईची मागणी केली होती.या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महसूल प्रशासनाने थेट गुन्हे दाखल करुन भूमाफियांना हादरा दिला आहे.या अनधिकृत प्लांट्समुळे परिसरात वायू-ध्वनी प्रदूषण,शेती-बागायतीवर परिणाम,नैसर्गिक निचऱ्याचे विघटन,पावसाळ्यात पूरस्थिती आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातांचा धोका निर्माण झाला होता.प्लांटमधील अवजड मिक्सर ट्रक विरुद्ध दिशेने धावून अपघाताला आमंत्रण देत होते.मोराळे यांनी नायगाव पोलीस ठाण्यात पुराव्यांसह तक्रारी दाखल करताच पोलिसांनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहेत.
तसेच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत व इतर ठिकाणच्या भागात मोठ्या प्रमाणात कायदेशीर माती भराव केला जात आहे. या बेकायदेशीर आता माती भराव प्रकरणी वसईच्या तहसील विभागाने भराव केलेल्या जागांवर बोजा (दंड) चढविण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षभरात ३३ प्रकरणात २४२ कोटी १५ लाखांचा बोजा सातबाऱ्यावर चढविला आहे.