सौजन्य फोटो - सोशल मिडीया
आळंदी : दिवेआगर येथे सहलीसाठी गेलेल्या आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत कोचिंग क्लासेस आणि विविध आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे. या कारवाईत दिवेआगर दुर्घटनेतील विद्यार्थ्यांशी संबंधित ‘विनर्स अकॅडमी’वर थेट सील ठोकण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या विशेष पथकाने संबंधित इमारतीची पाहणी केली असता अकॅडमीकडे व्यवसाय परवाना तसेच ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) नसल्याची माहिती समोर आली.
नगरपरिषदेच्या माहितीनुसार, श्री. नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीच्या मालमत्ता क्रमांक जुना ११३७ (नवीन LAN00001729) या इमारतीत ‘विनर्स अकॅडमी’ नावाने कोचिंग क्लासेस सुरू होते. नगरपरिषदेच्या अभिलेखांची तपासणी केली असता अकॅडमीने व्यवसाय परवाना किंवा आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र घेतले नसल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित क्लासचा कारभार आवश्यक परवानग्यांशिवाय सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार कर विभाग प्रमुख सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने कारवाई केली. पोलीस बंदोबस्तात विनर्स अकॅडमीच्या इमारतीला टाळे ठोकून ती सील करण्यात आली.
दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदी नगरपरिषदेने शहरातील कोचिंग क्लासेस तसेच इतर आस्थापनांच्या परवानग्यांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सर्व शिक्षण संस्था आणि कोचिंग क्लासेसनी आवश्यक व्यवसाय परवाने, ना-हरकत प्रमाणपत्रे आणि इतर कायदेशीर परवानग्या घेऊनच कारभार करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नगरपरिषदेने दिला आहे. दिवेआगर समुद्रकिनारी झालेल्या दुर्घटनेत आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कारवाईमुळे अनधिकृतपणे सुरू असलेल्या शैक्षणिक आस्थापनांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.






