सख्या बापाकडून पोटच्या 3 मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार (फोटो सौजन्य-X)
Nalasopara Crime News Marathi: पुणे स्वारगेट बसस्थानकातील 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना ताजी असताना नालासोपारातून आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मुंबईतील काही अंतरावर असणाऱ्या नालासोपर परिसरात एका इसमाने आपल्या पोटच्या तीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तीन मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.
मुलींचे वडील खंडनी, गोळीबार आणि खून यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा आरोपी आहे. बुधवारी (26 फेब्रुवारी) नालासोपारा पोलिसांनी मुलींचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीचा शोध नालासोपारा पोलीस घेत आहेत. पीडित मुली या सख्ख्या बहिणी आहेत. त्या मूळच्या कोकणातील राहणाऱ्या असून मुलींचा ५६ वर्षीय वडील एक कुख्यात गुन्हेगार आहेत. त्याला एकूण 5 मुली आहेत. कोकणातील गावी असताना तो या मुलींवर बळजबरी करुन त्यांचे लैंगिक शोषण करायचा. यापैकी एका मुलीचा चार वेळा गर्भपात ही करण्यात आला. अखेर वडिलांच्या छळाला कंटाळून आई पाचही मुलींना घेऊन नालासोपारा येथे एका नातेवाईकाच्या आश्रयाला आली.
या तीन मुलींपैकी मोठी मुलगी २१ वर्षांची आहे आणि इतर दोन मुली तिच्यापेक्षा लहान आहेत. जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्याने लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या मुलीने याबाबतची फिर्याद दिली आहे. आतापर्यंत वडिलांच्या दहशतीमुळे गप्प बसल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले. मुलींच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा एक कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खून, हल्ला, गोळीबार इत्यादी गंभीर गुन्हे दाखल आहेत. नात्याला काळीमा फासणार्या या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणात आता पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपी फरार असून पोलिसांची ८ पथकं त्याच्या मागावर आहेत. दरम्यान पीडित तरुणीचा मेडिकल रिपोर्ट समोर आला असून पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.पीडित मुलगी सकाळी साडेपाचच्या सुमारास स्वारगेट एसटी बसस्थानकात आली. ती फलटणला निघाली होती. त्यासाठी बसची वाट पाहात थांबली असताना गाडेने तिला हेरले. त्याने ताई फलटणची बस येथे लागत नाही, पलीक़डे लागते असे तिला सांगितले. मात्र पीडितेने मी नेहमीच येथून बसते असे म्हणत पलीकडे जाण्यास नकार दिला.
त्यावर त्याने मी इथे गेली दहा वर्षे काम करत आहे, असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. यानंतर तिला स्वारगेट – सोलापूर शिवशाही बसजवळ नेले. तिथे गेल्यावर तिने बसमध्ये अंधार असल्याच सांगितले. यावर गाडेने रात्रीची बस असल्याने प्रवासी लाईट बंद करुन झोपले असल्याचे सांगितले. पाहिजे तर मोबाइलची लाइट लावून बघून ये, असे तो म्हणाला. त्याच्यावर विश्वास ठेवत तरुणी बसमध्ये चढली. हीच संधी साधत गाडेने पाठी मागून येऊन पीडितेचा गळा आवळला. यानंतर तिला ठार मारण्याची धमकी दिली आणि लैंगिक अत्याचार केला. या घटनेने तरुणीला मोठा धक्का बसला होता. तिने खाली आल्यावर एक प्रवाशाला गाडेने केलेल्या कृत्याबद्दल माहिती दिली. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर तरुणी काही वेळाने आलेल्या फलटणच्या बसमध्ये बसून निघून गेली.